नवी दिल्ली : कर्नाटक बँकेतील चार कर्ज खात्यांत २८५ कोटींपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा झाला असून, बँकेने त्याची माहिती रिझर्व्ह बँकेला दिली आहे. डीएचएफएलसह चार कंपन्यांची कर्ज खाती अनुत्पादक भांडवलात (एनपीए) गेली आहेत.
कर्नाटक बँकेने शुक्रवारी शेअर बाजारास पाठविलेल्या माहितीत म्हटले आहे, बँकेत २८५.५२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण समोर आले आहे. २००९ ते २०१४ या काळात बँकांच्या एका समूहाने दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन (डीएचएफएल), रेलिगेयर फिनवेस्ट, फेडर्स इलेक्ट्रिक अँड इंजिनिअरिंग आणि लील इलेक्ट्रिकल्स या कंपन्यांना कर्ज दिले होते. या बँक समूहात कर्नाटक बँकेचा समावेश होता. यातील सर्वाधिक १८०.१३ कोटींचे कर्ज डीएचएफएलकडे थकले आहे. रेलिगेयर फिनवेस्टकडे ४३.४४ कोटी, फेडर्स इलेक्ट्रिककडे ४१.३० कोटी आणि लील इलेक्ट्रिकल्सकडे २०.६५ कोटी थकले आहेत. डीएचएफएल आमच्यासोबत २०१४ पासून जोडलेली आहे. कंपनीने बँक समूह व्यवस्थेच्या माध्यमातून अनेक कर्ज सुविधा घेतल्या आहेत. या समूहात आपली बँकही एक सदस्य आहे. कंपनीच्या खात्यास ३० आॅक्टोबर २०१९ मध्ये एनपीएमध्ये टाकण्यात आले. आता बँकेकडून एकूण १८०.१३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची माहिती रिझर्व्ह बँकेला देण्यात आली आहे. रेलिगेयर इन्व्हेस्ट ही कंपनीही २०१४ पासून बँकेला जोडली गेलेली आहे. बँक समूहाने कंपनीच्या खात्यास आॅक्टोबर २०१९ मध्ये एनपीए घोषित केले.