नवी दिल्ली: 2021 मध्ये मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) दररोज सरासरी 29 आणि राजस्थानमध्ये(Rajasthan) 14 मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'चाइल्ड राइट्स अँड यू' (CRY) च्या 'स्टेटस रिपोर्ट ऑन मिसिंग चिल्ड्रन' या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, उत्तर भारतातील चार प्रमुख राज्यांमध्ये मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 2021 मध्ये दिल्लीतील आठ जिल्ह्यांमध्ये दररोज पाच मुले बेपत्ता झाली आहेत. तर, उत्तर प्रदेशातील 58 जिल्ह्यांमध्ये दररोज सरासरी आठ मुले बेपत्ता होतात.
मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये बेपत्ता मुलींची संख्या अधिकअहवालात म्हटले आहे की 2021 मध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये हरवलेल्या मुलींची संख्या मुलांपेक्षा पाच पट जास्त आहे. नॅशनल क्राईम ब्युरोच्या 2020 च्या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशात 8,751 आणि राजस्थानमध्ये 3,179 मुले बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. CRY च्या भागीदार संस्थांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) दाखल केलेल्या अर्जांना उत्तर देताना, सरकारने नोंदवले की 2021 मध्ये, मध्य प्रदेशात 10,648 आणि राजस्थानमध्ये 5,354 मुले हरवल्याची नोंद झाली.
पाच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मुले बेपत्ता आरटीआय अर्जांद्वारे गोळा केलेल्या डेटावरून असे दिसून येते की इंदूर, भोपाळ, धार, जबलपूर आणि रीवा हे मध्य प्रदेशातील बेपत्ता मुलांच्या संख्येच्या बाबतीत पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आहेत. दररोज 24 मुली आणि पाच मुलांसह सरासरी 29 मुले मध्य प्रदेशातून बेपत्ता होतात, असे अहवालात म्हटले आहे.
यूपीच्या 58 जिल्ह्यांमध्ये 2 हजारांहून अधिक मुले बेपत्ता 2021 मध्ये उत्तर प्रदेशातील 75 पैकी 58 जिल्ह्यांमधून एकूण 2,998 मुले - 835 मुले आणि 2,163 मुली - बेपत्ता झाली. राज्यातील बेपत्ता मुलांपैकी सुमारे 88.9 टक्के मुले 12 ते 18 वयोगटातील होती. उत्तर प्रदेशातील बेपत्ता मुलांच्या संख्येच्या बाबतीत पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये लखनौ, मुरादाबाद, कानपूर नगर, मेरठ आणि महाराजगंज यांचा समावेश असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.