नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधिकांची संख्या वाढतच चालली आहे. सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशभरातून आतापर्यंत जे आकडे आले आहे. त्यापैकी अधिकांश आकडे हे दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तब्लिगी जमातच्या कार्यक्रमाशी संबंधित आहेत. देशातील 14,378 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 4,291 म्हणजेच 29.8 टक्के लोक हे निजामुद्दीन मरकज क्लस्टर सिंगल सोर्सशी संबंधित असल्याचे आढळून आले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. ते कोरोनासंदर्भातील आपल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत बोलत होते.
अग्रवाल म्हणाले, तब्लिगी जमातशी संबंधित रुग्ण हे देशातील 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येनुसार टॉप 10 राज्यांमध्ये पाच राज्ये अशी आहेत, जेथे जमाती रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तामिळनाडूमध्ये 84 टक्के, दिल्ली मध्ये 63 टक्के, तेलंगाणामध्ये 79 टक्के, आंध्र प्रदेशाते 61 टक्के तर उत्तर प्रदेशात 59 टक्के कोरोनाबाधीत हे तब्लिगी जमातशी संबंधित आहेत अथवा जमातींच्या संपर्कात आले आहेत. देशात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 3.3 टक्के आहे. जे इतर अनेक देशांच्या तुलने फार कमी आहे.
अरुणाचलचेही नाव जोडले गेले - एका राज्यात तर एकट्या तब्लिगी जमातशी संबंधितच तब्बल 91 टक्के रुग्ण आढळून आले आहेत. आसाममध्ये 35 पैकी 32 जण म्हणजे 91 टक्के लोक, अंडमानमध्ये 12 पैकी 10 म्हणजे 81 टक्के लोक जमातशी संबंधित आहेत. अरुणाचल प्रदेशात एक कोरोनाबाधित आढळून आला आहे. तोही तब्लिगी जमातशी संबंधित आहे. या एका रुग्णामुळे कोरोना प्रभावित राज्यांच्या यादीत अरुणाचलचा समावेश झाला आहे.
जमातींमुळे या देशांतही अवघड स्थिती -तब्लिगी जमातच्या सदस्यांनी केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांतही चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. हे लोक पाकिस्तान, मलेशिया आणि ब्रुनेईमध्येही गेले. पाकिस्तानातील सिंध प्रांतात तब्लिगी जमातच्या 429 जणांना करोनाची लागण झाली आहे. या लोकांनी पंजाब प्रांतातील रावळपिंडी येथे एका वार्षिक धार्मिक कार्यक्रमात भाग घेतला होता. तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात तब्लिगी जमातच्या संक्रमित सदस्यांची संख्या 1,100 एवढी आहे.
मृतांमध्ये 83 टक्के लोक वृद्ध अथवा आजारी - कोरोनामुळे होणाऱ्या मृतांमध्ये अद्याप 83 टक्के वृद्ध अथवा आजारी व्यक्तींचा समावेश आहे. देशातील 45 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य विभाग प्रशासनासोबत आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे. मात्र, ज्या 23 राज्यांतील 47 जिल्ह्यांत सर्वप्रथम संक्रमित आढळून आले होते, तेथे गेल्या 28 दिवसांत एकही नवा रुग्ण आढळलेला नाही, असेही केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.