- एस. पी. सिन्हारांची- राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षणातून झारखंडमधल्या स्थितीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. झारखंडमधल्या 29 टक्के पुरुषांना स्वतःच्या पत्नीवर विश्वास नाही, हे सर्वेक्षणातून समोर आलं आहे. गर्भनिरोधक साधनांचा वापर करणा-या महिलांचे संबंध अनेक पुरुषांशी असल्याचीही शक्यता या पुरुषांनी वर्तवली आहे. 60 टक्के विवाहित महिला आणि पुरुष गर्भनिरोधक साधनांचा वापर करत नसल्याचंही या सर्व्हेतून स्पष्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणातून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.
झारखंडच्या उर्वरित भागात 40 टक्के प्रकरणांमध्ये गर्भनिरोधक उपायांचा वापर केला जातोय. शहरी भागात याचं प्रमाण 47 टक्क्यांच्या आसपास आहे. तर ग्रामीण भागात 38 टक्के माणसं या साधनांचा वापर करतात. खरं तर 15 ते 49 वर्षं वयाच्या 56 टक्के पुरुषांच्या मते, गर्भनिरोधक साधनं ही पुरुषांऐवजी महिलांनी वापरली पाहिजेत. गर्भनिरोधक उपायांच्या प्रकरणात 77 टक्के महिला नसबंदी करतात. गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर तीन टक्के महिला करतात, तर पुरुषांचं नसबंदीचा प्रमाण हे 0.2 टक्क्यांच्या जवळपास आहे. 15 ते 19 वर्ष वयाची 93 टक्के महिला आणि 98 टक्के पुरुष कोणत्याही प्रकारच्या गर्भनिरोधक साधनांचा वापर करत नाहीत. त्यामुळे लहान वयात मुलींच्या नशिबी मातृत्व येते. झारखंडमध्ये 17 वर्षांच्या 5 टक्के, 18 वर्षांच्या 13 टक्के आणि 19 वर्षांच्या 26 टक्के महिला पहिल्या मुलाला जन्म देतात. सर्वेक्षणानुसार, 38 टक्के मुलींचं लग्न हे कमी वयात असतानाच होते. वय वर्षं 15-19च्या विवाहित महिलांमध्ये 19 टक्के महिला मातृत्व धारण करतात. 15 ते 19 वर्षांच्या वयात 7 टक्के माणसं गर्भनिरोधक साधनांचा वापर करतात. 12वी किंवा त्याहून जास्त शिकलेल्या महिलांमध्ये नसबंदी करण्याचं प्रमाण 37 टक्के आहे. तर कधीही शाळेत न गेलेल्या महिलांमध्ये हे प्रमाण 16 टक्के आहे. महिलांची वंशाच्या दिव्याला जन्म देण्यासाठी प्राथमिकता आहे.