ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - इंडोनेशियातून कोळसा आयात करताना कृत्रिमरीत्या चढे दर दाखवायचे आणि ग्राहकांकडून जास्त दराने वीजबिलातून पैसे लुबाडायचे असा प्रकार घडल्याचा संशय असून हा घोटाळा 29 हजार कोटी रुपये किंवा 4.4 अब्ज डॉलर्स इतका प्रचंड असल्याचा अंदाज आहे. या घोटाळ्यात एकूण 40 कंपन्या असून यामध्ये अदानी समूहाच्या सहा कंपन्यांचा व अनिल अंबानींच्या कंपनीचाही समावेश आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचे मानले जाणाऱ्या गौतम अदानींच्या कंपन्यांची निष्पक्षपातीपणे चौकशी होईल का अशी उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
या संदर्भातले वृत्त प्रथम इकॉनॉमक अँड पॉलिटिकल वीकलीने याबाबत वृत्त दिले असून केंद्रीय अर्थखाते भारतातल्या 40 ऊर्जा कंपन्यांची चौकशी करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर, अदानी पॉवर राजस्थान, अदानी पॉवर महाराष्ट्र, अदानी विल्मर, व्योम ट्रेड या कंपन्यांचा समावेश आहे. या समूहाने वेगवेगळ्या राज्यांच्या ऊर्जानिर्मिती कंपन्यांना आयात कोळसा पुरवला आहे.
याखेरीज अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्टरचीही चौकशी करण्यात येत असल्याचे वृत्त ईपीडब्ल्यूने दिले आहे.
डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स या प्रकरणांची चौकशी करत असून फेब्रवारीमध्ये मनोज कुमार गर्ग यास अटक करण्यात आली. इंडोनेशियातून आयात कोळसाची किंमत जास्त दाखवून जवळपास 280 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप या प्रकरणात आहे.
वीजेचे दर निश्चित करताना अनेक घटकांबरोबच कच्च्या मालाची, म्हणजे कोळश्याची किंमत महत्त्वाची असते. हेच दर कृत्रिमरीत्या फुगवल्याने सर्वसामान्य ग्राहकांची हजारो कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा आरोप व्यक्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे इंडोनेशियातून थेट कोळसा आयात झाला असला तरी बिलं मात्र अन्य देशांच्या मार्फत आल्याचे दाखवल्याने आर्थिक अफरातफरीची शक्यताही डीआरआय पडताळत आहे.
भारताने 2014-15 मध्ये 212.11 दशलक्ष टन इतका कोळसा आयात केला, ज्याची किंमत 1.04 लाख कोटी रुपये होती. यामध्ये नक्की किंमत किती होती, आणि वाढवून किती लावली होती हे चौकशीअंती स्पष्ट होईल.
केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी इंडोनेशियातून आयात केलेल्या व एनटीपीसीला वितरीत केलेल्या कोळशाची किंमत वाढवून लावली होती का याची चौकशी करत असल्याचे डीआरआयने कळवल्याचे मान्य केले आहे.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या गौतम अदानी यांच्या अदानी समूहाची निष्पक्ष चौकशी या कोळसा घोटाळ्यात मोदी सरकार करेल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.