2 जी घोटाळयाचा निकाल राजकीय अस्पृश्यता संपवणार, करुणानिधी मोदींबरोबर राजकीय मैत्री करणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 12:34 PM2017-12-22T12:34:55+5:302017-12-22T13:38:58+5:30
2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे द्रमुकने सुटकेचा निश्वास सोडलायं.
नवी दिल्ली- 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे द्रमुकने सुटकेचा निश्वास सोडलायं. या प्रकरणात ए.राजा आणि करुणानिधी यांची कन्या कणिमोळी आरोपी असल्यामुळे तामिळनाडूत द्रमुकला याची जबर किंमत चुकवावी लागली. विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले होते. पण आता न्यायालयाच्या निकालामुळे फक्त कणिमोळी आणि राजा यांना नवीन राजकीय आयुष्य मिळणार नसून राज्य आणि केंद्रामध्येही काही समीकरणे बदलू शकतात.
द्रमुकची बदनामी करण्यासाठी 2 जी घोटाळयाचे कुभांड रचण्यात आले अशी प्रतिक्रिया द्रमुकचे नेते स्टालिन यांनी निकालानंतर दिली. या निकालामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन विरोधकांशी दोन हात करण्याचा द्रमुकचा मार्ग मोकळा झाला आहे तसेच काँग्रेस आणि भाजपा दोघेही द्रमुकला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करु शकतात. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळयावरुन पक्ष अडचणीत असताना काँग्रेस ठामपणे द्रमुकच्या मागे उभा राहिला नव्हता. आता मात्र काँग्रेस द्रमुकशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करेल.
पुढच्यावर्षी मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकासह आठ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा निकाल पाहून द्रमुक काँग्रेस किंवा भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकते असे राजकीय विश्लेषक ग्नानी संकरण यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चेन्नईमध्ये जाऊन करुणानिधी यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली होती. आता पर्यंत द्रमुकने कधीच भाजपाला साथ दिलेली नाही. पण देशातील बदलती राजकीय स्थिती आणि 2 जी स्पेक्ट्रमचा निकाल राजकीय अस्पृश्यता संपुष्टात आणू शकतो.
अशी झाली सुटका
2 जी स्पेक्ट्रम वाटप प्रकरणात सीबीआय न्यायालयाने गुरुवारी माजी दूरसंचार मंत्री ए.राजा आणि द्रमुक खासदार कणिमोळी यांच्यासह सर्व आरोपींची भ्रष्टाचार आणि आर्थिक अफरातफरीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाचा हा निकाल सर्वांसाठीच धक्कादायक आहे.