Indian Airforce Officers Terminated: केंद्र सरकारने भारतीय हवाई दलातील तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. 9 मार्च 2022 रोजी चुकीने पाकिस्तानमध्ये ब्रह्मोस मिसाईल कोसळली होती, त्या संदर्भात या तीन अधिकाऱ्यांच्या सेवा तात्काळ प्रभावाने समाप्त करण्यात आल्या आहेत. हवाई दलाने मंगळवारी बडतर्फीचे आदेश जारी केले.
मार्चमध्ये भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानात डागले गेल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. पाकिस्तानने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. आता कारवाई करत भारताने हवाई दलातील तीन अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. 9 मार्च लाहोरपासून सुमारे 275 किमी अंतरावर पाकिस्तानी हद्दीत ब्रह्मोस कोसळले होते. त्यामुळे एका कोल्ड स्टोरेजचे नुकसान झाले. मात्र, या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नव्हता. त्यावेळेस भारत सरकारने संपूर्ण घटनेवर खेद व्यक्त केला होता आणि चौकशी करण्याची ग्वाही दिली होती.
त्यानंतर या प्रकरणाची चौकशी व्हाइस एअर मार्शल आर के सिन्हा यांनी केली आणि त्यांच्या वतीने या संपूर्ण घटनेसाठी एकापेक्षा जास्त अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले. आता त्याच तपासाच्या आधारे हवाई दलाने तीन अधिकाऱ्यांना बडतर्फ केले आहे. भविष्यात असा निष्काळजीपणा होऊ नये म्हणून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण वादावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सभागृहात म्हणाले होते की, भारताची क्षेपणास्त्र यंत्रणा अतिशय सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे. पण, पाकिस्तानात मिसाईल कोसळणे, अनावधानाने घडलेली घटना आहे.
तपासात काय समोर आले?आरके सिन्हा यांच्या चौकशीत या घटनेला एकापेक्षा जास्त अधिकारी जबाबदार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते, त्यानंतर मोठी आणि कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्टपणे सांगण्यात आले. त्याच दिशेने ग्रुप कॅप्टन, विंग कमांडर आणि स्क्वाड्रन लीडरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.