जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराचे 3 जवान शहीद झाले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला आणि शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले, जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. श्रीनगरस्थित लष्कराच्या चिनार कोर (Chinar Corps) एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'ऑपरेशन हलन कुलगाम. कुलगाममधील हलानच्या उंच भागात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी 4 ऑगस्ट रोजी कारवाई सुरू केली.
दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात तीन जवान जखमी झाले आणि नंतर शहीद झाले. सध्या शोधमोहीम सुरू आहे. लष्कर अधिकाऱ्याने सांगितले की, चकमकीच्या ठिकाणी आणखी फौजा पाठवण्यात आल्या असून शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. यापूर्वी, काश्मीरमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची शाखा 'द रेजिस्टेन्स फ्रंट' (TRF) या दहशतवाद्यांच्या तीन साथीदारांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला येथील इम्रान अहमद नजर, श्रीनगर येथील वसीम अहमद मट्टा आणि बिजबेहारा येथील वकील अहमद भट अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, तिघांनाही पोलीस पथकाने विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे चेक पोस्टवरून पकडले. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून तीन हातबॉम्ब, पिस्तूल, एके-47 रायफल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.