श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील हंदवाडामध्ये आज संध्याकाळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर अचानक गोळीबार केला. या गोळीबारात तीन जवान शहीद झाले आहेत. तसेच, जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा खात्मा झाल्याचे समजते. दरम्यान, हंदवाडामधील वानीगाम परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी घेराव घातला असून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंदवाडा भागात सीआरपीएफच्या 92 बटालियनचे एक पथक गस्त घालत होते. त्यावेळी या भागातील वानीगाममध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. अचानक केलेल्या या गोळीबारात तीन जवान शहीद झाले. तर सात जवान जखमी झाले आहेत. याशिवाय, दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे.
जवानांवर हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. या हल्ल्याची माहिती मिळताच लष्कर, एसओजी आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून वानीगाम परिसरात घेराव घातला आहे. तसेच, दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे असून या भागात सर्व मार्ग सील करण्यात आले आहेत.
दरम्यान, काल जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथील राजवार परिसरात लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत दहशतवाद्यांशी दोन हात करताना लष्कराच्या पाच जणांसह जम्मू काश्मीर पोलीस दलातील एक जण शहीद झाला आहे. दहशतावाद्यांचा सामना करताना हौतात्म्य पत्करलेल्या पाच जणांमध्ये लष्करातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. तसेच, या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर हैदर यालाही जवानांनी कंठस्नान घातले.