नवी दिल्ली – महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय उलथापालथ झाली. २५ वर्ष हातात हात घालून निवडणुका लढणारे शिवसेना-भाजपा मुख्यमंत्रिपदावरून वेगळे झाले. भाजपा-शिवसेना युती तुटली आणि अक्षरश: दोन्ही पक्षांचे नेते आता एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आक्रमक पवित्रा घेत थेट शिवसेना नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यामुळे भाजपा-शिवसेनेतील वैर आणखी वाढलं आहे.
यातच भाजपा खासदाराने दिल्लीत संजय राऊतांची तब्बल ३ तास भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. एकमेकांवर टीका करण्याची संधी न सोडणारे भाजपा-शिवसेना नेत्याच्या भेटीनं वेगळं काही शिजतंय? का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. भाजपा खासदाराने दिल्लीत संजय राऊतांच्या घरी जाऊन भेट घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. भाजपा खासदार वरूण गांधी(BJP Varun Gandhi) आणि शिवसेना खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांच्यात डिनर डिप्लोमसी घडली आहे. अशी बातमी टीव्ही ९ नं दिली आहे.
मंगळवारी दिल्लीत राऊत-गांधी यांची बैठक झाली. यात देशपातळीवरील अनेक राजकीय विषयांवर चर्चा झाली. वरूण गांधी सध्या भाजपापासून अलिप्त राहत असून विविध मुद्द्यावर ते स्वपक्षाला घेरताना दिसत आहेत. त्यामुळे वरुण गांधी भाजपात नाराज असल्याची चर्चा आहे. अलीकडेच त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून भाजपा हा शब्दही हटवला आहे. उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील ते भाजपाचे खासदार आहेत. स्वपक्षीय नेत्यांवर टीकेची झोड उठवताना वरूण गांधी समोर आले आहेत. त्यामुळे ते भाजपातून बाहेर पडतील अशी शक्यता आहे.
संजय राऊतांचं मौन चर्चेत
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणेवर तोंडसुख घेणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केलेल्या एका ट्विटनं विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. कधी कधी मौन हेच सर्वात चांगल उत्तर असतं, असे ट्विट करत संजय राऊत यांनी करत यापुढे आपलं उत्तर हे मौन असणार असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, दररोज मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडणारे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मौन बाळगल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे.