नवी दिल्ली : श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये तब्बल आठ ठिकाणी रविवारी (21 एप्रिल) साखळी बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. ईस्टर संडेला झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात आतापर्यंत 207 जणांचा मृत्यू झाला असून 450 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर, जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सात जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.
कोलंबोतील या साखळी बॉम्बस्फोटात तीन भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. तसेच, कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे, असे सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले आहे. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी (21 एप्रिल) स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.45 वाजण्याचा सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे. या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो लोक मृत्युमुखी, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटांमध्ये किती नुकसान झाले याबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे.
ईस्टर संडे असल्याने चर्चमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 207 जणांचा मृत्यू झाला 450 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमी आणि मृतांमध्ये विदेशी पर्यटकांचाही समावेश अधिक असून 35 जणांचा मृत्यू झाला आहे. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.