नवी दिल्ली : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सोमवारी सौदी अरबस्तानच्या अरामको आणि एडनॉक या कंपन्यांमध्ये ३ लाख कोटींच्या रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्ष-या झाल्या.रत्नागिरी जिल्हयात ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’च्या (आरआरपीसीएल) वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी अरामको कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन एच.नसीर आणि संयुक्त अरब अमिरात(यूएई) चे राज्यमंत्री तथा एडनॉक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान आणि यूएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षºया केल्या.
इंडियन आॅईल कॉपोर्रेशन लिमिटेड (आयाओसीएल), भारत पेट्रोलियम कॉपोर्रेशन लिमिटेड (बीपीसीएल)आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉपोर्रेशन लिमिटेड (एचपीसीएल) या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी ५०:२५:२५ प्रमाणे भागिदारीतून ‘आरआपीसीएल’ या संयुक्त प्रकल्पाची २२ सप्टेंबर २०१७ रोजी स्थापना केली. आजच्या सामंजस्य करारामुळे रत्नागिरीतील आरआरपीसीएल प्रकल्पाच्यानिर्मिती व विकासासाठी भारतीय तेल कंपन्या व सौदी अरामको आणि एडनॉक या विदेशी कंपन्यांमध्ये ५०:५० प्रमाणे भागीदारी निश्चित झाली आहे.या प्रकल्पातून दिवसाला १.२ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यात येईल. तसेच, पेट्रोल, डिझेल व अन्य पेट्रोलियम उत्पादनेही या प्रकल्पातून करण्यात येणार आहेत. या सोबतच मोठ-मोठ्या प्रकल्पांसाठी कच्चा मालही या प्रकल्पातून पुरविण्यात येणार आहे.यापूर्वी ११ एप्रिल २०१८ रोजी १६ व्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाच्या मंत्रीस्तरीय शिखर संमेलनात सौदी अरामकोने भारतासोबत आरआरपीसीएल प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केला असून आज एडनॉक समूहाला सहगुंतवणूकदार केले आहे.