नवी दिल्ली - मागील ३ वर्षात ३.९२ लाख लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं. विशेष म्हणजे भारताच्या या नागरिकांनी १२० देशातील नागरिकत्व स्वीकारलं. त्यात सर्वात जास्त १.७० लाख लोकांनी अमेरिकेचं नागरिकत्व घेतले. केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत ही माहिती दिली. इतकेच नाही ४८ जणांनी भारत सोडून पाकिस्तानचं नागरिकत्व घेतल्याचंही संसदेत समोर आले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सांगितले की, परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ज्या लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं त्यांनी जगातील वेगवेगळ्या १२० देशांमध्ये नागरिकत्व घेतले आहे. या लोकांनी त्यांच्या खासगी कारणांसाठी भारताचं नागरिकत्व सोडलं आहे. लोकसभेत छापील उत्तरात सांगितले की, २०१९, २०२० आणि २०२१ या काळात ३ लाख ९२ हजार ६४३ लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं. त्यातील १ लाख ७० हजार ७९५ लोकांनी अमेरिकेचं नागरिकत्व घेतले.
तर ६४ हजार ७१ लोकांनी कॅनडाचं नागरिकत्व घेतले. ५८ हजार ३९१ लोकांनी ऑस्ट्रेलिया, ३५ हजार ४३५ लोकांनी यूके, १२ हजार १३१ लोकांनी इटली, ८ हजार ८३२ लोकांनी न्यूझीलँडचं नागरिकत्व स्वीकारलं. त्याशिवाय ७ हजार ४६ लोकांनी सिंगापूर, ६ हजार ६९० लोकांनी जर्मनी, ३ हजार ७५४ लोकांनी स्वीडन आणि ४८ जणांनी पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारलं आहे. २०२१ मध्ये म्हणजे मागील १ वर्षात १ लाख ६३ हजार ३७० लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं. त्यात सर्वाधिक ७८ हजार २८४ जणांनी अमेरिकेचं आणि २३ हजार ५३३ जणांनी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व घेतलं.
याआधी एका आरटीआय उत्तरात केंद्रीय गृहमंत्रालयाने मागील ५ वर्षात ६ लाखाहून अधिक लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडल्याची माहिती दिली. २०१७ ते २०२१ या काळात ६ लाख ८ हजार १६२ लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं. अंदाजे सरासरी वर्षाला १ लाख २१ हजार ६३२ जण भारताचं नागरिकत्व सोडतात. तर ५ वर्षात ५ हजार २२० परदेशी नागरिकांना भारतानं नागरिकत्व दिले आहे. त्यात ८७ टक्के पाकिस्तानातून आलेले ४५५२ जणांचा समावेश आहे. भारतात दरवर्षी १ हजार जणांना भारतीय नागरिकत्व दिले जाते. भारताचं नागरिक बनण्यासाठी सर्वात पुढे पाकिस्तान आहे. २०२१ या काळात १७४५ परदेशी लोकांनी भारताचं नागरिकत्व घेतले त्यात १५८० पाकिस्तानातून आलेल्यांचा समावेश आहे.