मेरठ- दिल्ली ते हरिद्वार रेल्वेने प्रवास करत असताना प्रवासादरम्यान तीन मुस्लिम तरूणांना मारहाण झाल्याची घटना बागपतजवळ घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच ते सहा अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. गुलजार अहमद, अबू बकर, मोहम्मद इसरार अशी मारहाण झालेल्या तिघांची नावं असून त्यातील एक जण धर्मगुरू असल्याचं समजतं आहे. बुधवारी रात्री दिल्लीतून तीन तरूण पॅसेंजरने आपल्या गावी बागपतला परतत होते. दरम्यान, काही तरुणांशी त्यांचा कुठल्या तरी कारणाहून वाद झाला. त्यानंतर हा वाद विकोपाला गेल्याने या तरुणांनी तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला करुन बेदम मारहाण केली, अशी माहिती बागपतचे पोलीस अधीक्षक जय प्रकाश सिंह यांनी दिली आहे.
पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत मारहाण करणाऱ्या अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बागपतचे रहिवासी असणारे गुलजार, इसरार आणि अबू हे दिल्लीहून पॅसेंजरने बागपतला परतत होते. त्यानंतर रेल्वेत त्यांची वादावादी झाल्याने रात्री सुमारे पावणे एक वाजता बागपत पोलीस स्थानकांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पॅसेंजरमधून प्रवास करत असताना काही जणांनी आमच्याशी वाद घालायला सुरूवात केली. त्यावेळी आम्ही अहेरा स्थानकावर उतरण्याचं ठरवलं. गाडीतून उतरण्यासाठी जागेवरून उठल्यावर सहा-सात जण उठले आणि त्यांनी आम्हाला रॉडने व टोकदार शस्त्राने मारायला सुरूवात केली. आम्हाला मारहाण का करताय? याची विचारण केल्यावर डोक्यावर रूमाल का बांधून ठेवला आहे, असं उत्तर त्यांनी दिलं, असं अहमदने सांगितलं.
या तरूणांवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. तरूणांना मारहाण करणारा सहा ते सात जणांचा गट होता. त्यामुळे ते रोज प्रवास करणारे असू शकतात. गाडीमध्ये जागा देण्यावरूनचा हा वाद असू शकतो. रेल्वे प्रवासादरम्यान या घटना नेहमीच्या आहेत, अशी शक्यता जीआरपी स्टेशनचे अधिकारी सुखपाल सिंह यांनी वर्तविली आहे.
संबंधित बातमी - दोन रुपयांचं नाणं रुळांमध्ये टाकत ट्रेन रोखून लुटपाट करणा-या टोळीचा पर्दाफाश