सुरेश एस डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू ( Marathi News ): राजौरीतील अतिरेकी हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्यानंतर घटनास्थळी तीन नागरिकांचे मृतदेह आढळल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाने राष्ट्रीय रायफल्सचे कमांडर ब्रिगेडियर पी. आचार्य यांच्यासह कर्नल व लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याची उचलबांगडी केली.
राजौरीत सुरक्षा दलाच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यानंतर टोपा पीर गावातील सफीर हुसैन, मोहम्मद शौकत व शब्बीर अहमद यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर या तिघांचे मृतदेह आढळले. सुरक्षा दलाच्या ताब्यात असताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर तीन अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली.
लष्करप्रमुखांची भेट
गेल्या आठवड्यात पूंछमध्ये ५ जवान शहीद झाल्यानंतर अतिरेक्यांचा शोध सुरू असताना, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. लष्करी जवान, अधिकाऱ्यांना अत्यंत व्यावसायिक पद्धतीने मोहीम राबविण्यासाठी प्रोत्साहित केले.
वर्षभरात १३४ मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये २०२३ या वर्षभरात झालेल्या विविध घटनांमध्ये ८५ अतिरेकी, ३५ जवान आणि १४ नागरिकांचा मृत्यू झाला. खोऱ्यात झालेल्या एकूण चकमकींपैकी सर्वाधिक घटना पूंछ, राजौरीमध्ये झाल्या असून त्यात २५ जवान शहीद झाले.