जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. गेल्या काही दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, याला भारतीय सुरक्षा रक्षकांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील मेंधार सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय लष्कराच्या सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.
एएनआयच्या माहितीनुसार, गेल्या 9 फेब्रुवारी रोजी मेंधार सेक्टरमध्ये भारतीय सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिले. याचबरोबर, मेंधार सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सकडून शस्त्रसंधीचे उल्लंघनही करण्यात आले. काही दिवसांपूर्वी विविध ठिकाणी पाकिस्तानकडून अशा प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यावेळी भारतीय सुरक्षा रक्षकांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला भारतीय सुरक्षा रक्षकांनी उधळून लावला होता. श्रीनगरमधील परिम पोरा येथील चेक पोस्टवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हा हल्ला परतवून लावताना सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते, तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले.