नवी दिल्ली : आसाममधील राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनसीआर)च्या अंतिम यादीत नावे नसलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही. त्यांना देश सोडून जावे लागणार, असल्याचे भारतीय जनता पार्टीचे महासचिव राम माधव यांनी सांगितले. सोमवारी दिल्लीत 'एनआरसी: डिफेंडिंग द बॉर्डर्स, सेक्युरिंग द कल्चर' या विषयावर आयोजित एका कार्यक्रमात राम माधव बोलत होते. यावेळी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
1985 मध्ये झालेल्या करारानुसार एनआरसी यादी अपडेट करण्यात येत आहे. सरकारने राज्यात अवैधरित्या राहाणाऱ्या नागरिकांची माहिती काढून त्यांना देशाबाहेर जाण्यास सांगितले होते. आता एनआरसीमुळे राज्यात अवैधरित्या राहणाऱ्या नागरिकांची एक वेगळी ओळख निर्माण होईल, असे राम माधव यांनी सांगितले. मात्र, एनआरसीच्या अंतिम यादीत नावे नसलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही. त्यांना देश सोडून जावे लागणार, असे राम माधव म्हणाले. जगातील कोणताही देश अवैध्यरित्या घुसखोरी केलेल्या लोकांना आपल्या देशात राहू देत नाही. परंतू भारतात राजकीय कारणांमुळे अशा लोकांसाठी धर्मशाळाच बनली आहे, असेही राम माधव यावेळी म्हणाले.
देशातील सर्व राज्यांमध्ये एनआरसी लागू केली पाहिजे. भारतातील सर्व नागरिकांच्या सुरक्षतेसाठी एनआरसी योग्य आहे. तसेच, आसाममधील एनआरसी यादीत समावेश नसलेले नागरिक अन्य राज्यात जाऊ शकतात. यासाठी ठोस पाऊले उचलायला हवी, असे आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले.