काश्मीरः जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये जवान अन् पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. ही चकमक अनंतनागच्या रुनिपोरा भागात घडल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. आजच्या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसह यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने 116 अतिरेक्यांना ठार केले आहेत. त्यापैकी या महिन्यातच 38 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अहवालानुसार लष्कराच्या १९ राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकानं रुनिपोरा भागात संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांना ठार केलं आहे.घटनास्थळावरून रायफल व पिस्तूल जप्तसुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना वेढा घालण्यास सुरुवात करताच या भागात लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. पोलीस आणि सीआरपीएफनेही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. घटनास्थळावरून सैन्याने शस्त्रे हस्तगत केली आहेत. जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये एक रायफल आणि 2 पिस्तूल यांचा समावेश आहे. घटनास्थळी पोलीस कारवाई सुरू असून, पोलिसांनी परिसराला घेराव घालून तेथे शोधमोहीम राबवली आहे.आतापर्यंत 116 दहशतवाद्यांना केले ठारअधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, आज झालेल्या चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांसह सुरक्षा दलाने यावर्षी 116 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जून महिन्यात अवघ्या 29 दिवसांत 38 अतिरेकी ठार करण्यात आले आहेत. लष्करानं ठार केलेल्या दहशतवाद्यांमध्ये वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे 6 कमांडरचाही समावेश आहे. यावर्षी रियाझ नायकू हा दहशतवादीसुद्धा जवानांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाल्याने हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे.