जम्मू-काश्मीरमधील दोन वेगवेगळ्या भागात आज शनिवारी सकाळपासूनच सुरू असलेल्या भीषण चकमकीत लष्कराच्या जवानांनी तीन दहशत वाद्यांना कंठस्नान घातले आहे. लष्कराच्या जवानांनी कोकरनाग, अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना मारले, तर श्रीनगरच्या खानयारमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा केला. या चकमकीत दोन SOG जवान आणि दोन CRPF जवान गंभीर जखमी झाले आहेत.
खानयारमध्ये ज्या घरात दहशतवादी लपून बसले होते, त्या घरात मोठा स्फोट झाला, यानंतर आग लागली आणि परिसरात धुराचे लोट पसरले, तसेच इतर तीन घरांनाही याचा फटका बसला आहे. या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या चार जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी दहशत पसरवण्यासाठी रोजच्या रोज नवनवीन डावपेच अवलंबत आहेत. मात्र, लष्कराला कोणत्या ना कोणत्या मार्गाने दहशतवाद्यांची माहिती मिळतेच. याचप्रमाणे श्रीनगरच्या खानयारमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. एवढेच नाही, तर यात त्यांचा मोठा कमांडर असून तो काही तरी मोठे कृत्य करणार असल्याची माहितीही लष्कराला मिळाली होती. माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि सकाळपासून दहशतवादी घराबाहेर येण्याची वाट पाहत होते, मात्र दहशतवाद्यांनी घरातूनच गोळीबार सुरू केला.
या घरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराने एका विशिष्ट प्रकारच्या रसायनाचा वापर केला. ज्यामुळे घरात एका बाजूला आग लागून धूर निघेल आणि हे पाहून दहशतवादी बाहेर पडतील. मात्र तसे झाले नाही. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच होती. खानयारमध्ये दहशतवाद्याचा खात्मा होण्यापूर्वी थांबून-थांबून गोळीबार सुरूच होता.