- विकास झाडे
नवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुरुवारी शोककळा पसरली. आंदोलन स्थळावरून गावाकडे परत जाण्यासाठी रस्त्यांच्या दुभाजकावर बसून रिक्षाची वाट पाहत असताना भरधाव वेगाने आलेल्या डम्परने महिलांना चिरडले. त्यात तिघींचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य जबर जखमी झाल्या.
सकाळी सव्वासहाच्या सुमारास सोनिपत मार्गावरील पकोडा चौकात ही घटना घडली. सर्व महिला शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. छिंदर कौर भान सिंग (६०), अमरजित कौर हरजित सिंग (५८), गुरमेल कौर भोला सिंग (६०) असे मृत महिलांची नावे आहेत. सर्व महिला पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील खिवा दयालवाला गावातील रहिवासी आहेत. त्या झज्जर रोड उड्डाणपुलाजवळील बायपासजवळ राहत होत्या.
राहुल गांधी व केजरीवाल यांची टीका या घटनेवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ‘देशाच्या अन्नदात्याला ट्रकखाली चिरडले जात आहे. हे क्राैर्य आणि द्वेष आपल्या देशाला पाेखरून काढत आहे. पीडित महिलांच्या कुटुंबीयांसाेबत माझ्या सहवेदना आहेत,’ असे ट्वीट राहुल गांधींनी केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने हट्ट सोडून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर सातत्याने होणाऱ्या दुर्घटना घडल्या नसत्या, असे त्यांनी सांगितले.