नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे. तसेच लोकांना ताप, सर्दी, खोकला यासह काही लक्षणं आढल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या असं आवाहन केलं जात आहे. मात्र अनेकदा लोकं निष्काळजीपणा करतात आणि नंतर त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊन परिस्थिती गंभीर होते. याच दरम्यान एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. सर्दी-खोकल्याची काही लक्षणं दिसली म्हणून 3 वर्षांची चिमुकली एकटीच डॉक्टरांकडे गेल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागालँडच्या (Nagaland) झुन्हेबोटो जिल्ह्याच्या घटाशी तालुक्यात ही घटना घडली आहे. लिपवी असं या तीन वर्षांच्या चिमुकलीचं नाव आहे. 'दी मोरंग एक्स्प्रेस' नुसार, लिपवीला सर्दी आणि खोकल्याची सामन्य लक्षणं होती. तिचे आई-वडील हे शेतात काम करण्यात व्यस्त असतात. त्यामुळे तिने एकटीनेच हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये चेकअप करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. लिपवी एकटीच मास्क लावून हेल्थ सेंटरमध्ये आलेली पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तिचा डॉक्टरसोबतचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
लिपवीच्या या कृतीचं अनेकांनी भरभरून कौतुक केलं आहे. तसेच तिने नेटिझन्सलाही भूरळ पाडली आहे. सर्वांनाच तिचा एकटीने रुग्णालयात जाण्याचा निर्णय आवडला आहे. बेंजामिन येप्थोमी (Benjamin Yepthomi) यांनी ही मुलगी आरोग्य केंद्रातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं आहे. जेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांच्या लिपवीला हेल्थ सेंटरमध्ये पाहिलं. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं. तिच्यामध्ये सर्दी-खोकल्याची काही लक्षणं आढळून आली आहे. तिचे आई-बाबा शेतात काम करण्यासाठी जातात. त्यामुळे तिने एकटीने डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 1,20,529 नवे रुग्ण; 58 दिवसांतील नीचांक
देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 58 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,20,529 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,380 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,86,94,879 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 3,44,082 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (5 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 लाख 20 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तीन लाखांवर पोहोचला आहे.