नवी दिल्ली : ज्या युवकांना लष्करात आयुष्य व्यतीत करायचे नाही; परंतु त्या क्षेत्रातील थरार आणि धाडसाचा अनुभव घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी भारतीय लष्कराने अधिकारी आणि सैनिक म्हणून तीन वर्षांसाठीची इंटर्नशिप (आंतरवासिता) ‘टूर आॅफ ड्यूटी’ (टीओडी) करण्याची योजना आणली आहे.देशात आज राष्ट्रवाद आणि देशभक्तीची लाट आली असली तरी बेरोजगारी हीदेखील वस्तुस्थिती आहे, असे सांगून लष्कराने या पार्श्वभूमीवर युवकांना तीन वर्षांची इंटर्नशिप करता येईल, असे म्हटले आहे. या प्रस्तावानुसार ज्या युवकांना आपले करिअर संरक्षण दलात करायचे नाही; पण सैन्यातील थरार व धाडसाचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा छोटा, ऐच्छिक ‘कर्तव्य दौरा’ आहे. सशस्त्र दलांतील कायमस्वरूपी सेवा/नोकरी या संकल्पनेतून बाजूला होऊन तीन वर्षांसाठी इंटर्नशिप/तात्पुरता अनुभव घेण्यासाठीचा हा प्रस्ताव आहे. असे असले तरी या इच्छुक उमेदवारांसाठी प्रवेशाचे निकष (एन्ट्री क्रायटेरिया) शिथिल केले जाणार नाहीत.लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी असा प्रस्ताव असल्याला दुजोरा दिला व त्यावर सध्या चर्चा सुरू असल्याचे सांगितले. जर हा प्रस्ताव स्वीकारला गेला, तर ‘कर्तव्य दौरा’ हा काही बंधनकारक असणार नाही, यावर त्यांनी भर दिला. या प्रस्तावातील महत्त्वाचा मुद्दा असा की, या प्रस्तावाला जे कोणी पसंती देतील ते सरकार, सशस्त्र दले, कंपन्या आणि त्यातही महत्त्वाचे म्हणजे व्यक्तींसाठी तो आकर्षक करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार तीन वर्षांसाठी व्यक्तीचे उत्पन्न हे करमुक्त केले जाऊ शकेल आणि तो किंवा तिला सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्या तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्राधान्य दिले जाईल. केंद्र किंवा राज्य सरकारच्या नोकऱ्यांसाठी सरकार हा ‘कर्तव्य दौरा’ बंधनकारक निकष करणार नाही.
लष्करात ३ वर्षे इंटर्नशिपची संधी, प्रवेशाचे निकष मात्र शिथिल होणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 5:46 AM