मुंगेर (बिहार) - बोअरवेलच्या 110 फूट खोल खड्ड्यात अडकलेली चिमुकली, तिला वाचवण्यासाठी आर्त आक्रोष करणारी तिची आई, प्रतिकूल परिस्थितीत तब्बल 31 तास एनडीआरएफच्या पथकाकडून चाललेले बचाव कार्य, बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील एका गावात चाललेल्या जीवन-मृत्यूच्या या झुंजीत अखेर जीवन जिंकले. 21 तासांच्या अथक बचाव कार्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने आणि लष्कराच्या जवानांनी तीन वर्षांच्या या चिमुकलीला सुखरूपपणे बाहेर काढले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली. घराच्या आवारात खेळत असलेली तीन वर्षांची सना 110 फूट खोल बोअरवेलमध्ये पडली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एनडीआरएफ आणि लष्कराला पाचारण करण्यात आले. त्यांनी तात्काळ बचाव कार्यास सुरुवात केली. मात्र मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. जसजसा वेळ जात होता तसतसे ही चिमुकली वाचण्याची शक्यता धुसर होत होती. अखेर 31 तासांच्या बचाव कार्यानंतर एनडीआरएफचे पथक या चिमुकलीपर्यंत पोहोचले. बचाव कार्यादरम्यान मुलीचा पाय अडकलेला असल्याने तिला बाहेर आणण्यात थोडा उशीर झाला. या चिमुकलील सुखरूपपणे बाहेर काढल्यानंतर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
110 फूट खोल बोअरवेलमध्ये तिने 31 तास दिली मृत्यूशी यशस्वी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 8:58 AM