- संजय शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना सुरतच्या कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला आहे. या ३० दिवसांत त्यांना दिलासा मिळाला नाही तर त्यांचे संसद सदस्यत्व जाऊ शकते व सहा वर्षांसाठी निवडणूक लढण्यास ते अपात्र ठरविले जाऊ शकतात.
मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना दोषी धरून कोर्टाने सशर्त जामिनावर सोडले आहे. ३० दिवसांत त्यांना वरच्या कोर्टात जाता यावे, यासाठी ही तरतूद केली आहे. निवडणूक आयोगाच्या लोकप्रतिनिधी कायदा १९५१च्या कलम ८ नुसार दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झालेल्यांचे सदस्यत्व समाप्त होऊ शकते. आमदार किंवा खासदाराचे सदस्यत्व जाऊ शकते व शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही सहा वर्षे निवडणूक लढण्यास अपात्र ठरवले जाऊ शकते. पाटणा आणि रांचीच्या कोर्टातही अशाच प्रकारची याचिका दाखल झालेली आहे.
...तर काय होणार? या प्रकरणात लोकसभा अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे. शिक्षा कायम राहिली तर राहुल गांधी यांना अपात्र ठरविण्याची तक्रार लोकसभा सचिवालय निवडणूक आयोगाला देईल. त्यानंतर आयोग अधिसूचना जारी करू शकतो की, केरळच्या वायनाडची जागा आता रिक्त झाली आहे व सहा महिन्यांच्या आत तेथे निवडणूक घेतली जाईल.
आजवर कोणा कोणाचे सदस्यत्व रद्द झाले? - चारा घोटाळ्यात २०१३ मध्ये पाच वर्षांची शिक्षा झाल्यानंतर लालूप्रसाद यादव यांचे सदस्यत्व रद्द झाले व ते निवडणूक लढण्यासाठी अपात्र ठरले. - काँग्रेसचे खासदार रशीद मसूद यांना एमबीबीएस जागा घोटाळ्यात २०१३ मध्ये चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर ते अपात्र ठरविण्यात आले होते. - हमीरपूरचे भाजप आमदार अशोक चंदेल यांना २०१९मध्ये हत्या प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर सदस्यत्व गमवावे लागले होते.- उन्नावमध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणात बांगरमऊचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांचे २०१९मध्ये सदस्यत्व गेले होते. - या वर्षी फेब्रुवारीत आजम खान यांचे पुत्र अब्दुल्ला आजम यांना एका प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर त्यांची आमदारकी गेली होती.
राहुल गांधींना जामीन मिळाला आहे. आम्हाला सुरुवातीपासून माहीत होते. कारण ते न्यायाधीश बदलत राहिले. आमचा कायदा, न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि आम्ही कायद्यानुसार त्याविरोधात लढू. - मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेसराहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र ते सत्य बोलतच राहतील. माझ्या भावाला कधीही भीती वाटली नाही आणि कधीही वाटणार नाही. सत्य बोलत जगलो, सत्य बोलतच राहणार. - प्रियांका गांधी, सरचिटणीस, काँग्रेसकाही बोलण्यापूर्वी मी आदेशाची प्रत पाहीन. राहुल गांधी जे काही बोलतात ते नेहमीच काँग्रेस पक्षावर आणि संपूर्ण देशावर चुकीची छाप पाडतात. काँग्रेसच्या काही खासदारांनी मला सांगितले आहे की, राहुल यांच्या वृत्तीमुळे काँग्रेसचेच नुकसान होत आहे. - किरेन रिजिजू, केंद्रीय कायदामंत्रीशब्दांची प्रतिष्ठा नेहमीच जपली पाहिजे. या निर्णयातून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी धडा घेतला पाहिजे. - राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री