कानपूर - कनौज येथील अत्तर व्यापारी पियुष जैन (IT Raid on Piyush Jain) याच्या घरावर जीएसटी इंटेलिजन्स आणि आयकर विभागाचे छापे आजही सुरू आहेत. पियुष जैनच्या घरातून आतापर्यंत 177 कोटींची रोकड आणि मोठ्या प्रमाणात सोने, चांदीची नाणी आणि बिस्किटे जप्त करण्यात आल्याचे समजते. आज चौथ्या दिवशीही जैन याच्या घरावर टाकलेल्या धाडीत 23 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. त्यासोबतच, चंदनाचं तेलही आढळून आलं. अद्यापही नोटांची मोजणी सुरूच आहे.
कानपूरमधील अत्तर व्यापारी पियुष जैन याच्या घरातील छापेमारीचं मोजमाप अद्यापही सुरुच आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अद्यापही त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात येत असून मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तू सापडत आहेत. आज चौथ्या दिवशी डीजीजीआयच्या पथकाने 17 कोटी रुपयांची रोकड मोजली असून तब्बल 23 किलो सोनं जप्त केलं आहे. जैनच्या घरी 600 किलो चंदनाचं तेल आढळून आलं असून हे तेल काचेच्या बाटल्यांमध्ये भरण्यात येत आहे. त्यासाठी, 500 रिकाम्या बाटल्या मागविण्यात आल्या आहेत. सॅम्पलिंग आणि नोटांचं मोजमाप मंगळवार संध्याकाळपर्यंत सुरूच राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे, पियुष जैन याच्या घरातून एकूण किती संपत्ती जप्त झाली हे मंगळवारीच कळू शकणार आहे.
पियुष जैनच्या मोठ्या संकुलात एकूण चार घरे बांधण्यात आली आहेत. अत्यंत गूढ पद्धतीने बांधलेल्या या घरांमध्ये प्रवेश करण्यासाठी एकूण आठ दरवाजे आहेत. यापैकी कोणतेही घर एकमेकांशी जोडलेले नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांना एका घरातून दुसऱ्या घरात जाण्यासाठी बाहेर पडावे लागते. आतापर्यंत येथून सुमारे चार भरलेल्या गोण्या सापडल्या असून, त्यात नोटा असल्याची चर्चा आहे. सोन्याची नाणी आणि बिस्किटेही मोठ्या प्रमाणात मिळाल्याची चर्चा आहे.
अनेक ठिकाणांवर छापे
पीटीआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या छाप्याच्या काही छायाचित्रांमध्ये व्यापारी पियुष जैनच्या निवासी परिसरात मोठ्या कपाटांमध्ये रोख रकमेचे ढीग दिसत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, कानपूर, गुजरात आणि मुंबईतील अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. अधिकार्यांनी शहरातील 'शिखर' ब्रँडचा पान मसाला आणि इतर तंबाखू उत्पादनांच्या कारखान्यावरही छापा टाकला आहे.