अजनी भागात ३० मीटर रुंदीचा रस्ता
By admin | Published: August 03, 2015 10:31 PM
महापौरांनी केली पाहणी : पूर्व व दक्षिण नागपुरातील नागरिकांना सुविधा
महापौरांनी केली पाहणी : पूर्व व दक्षिण नागपुरातील नागरिकांना सुविधानागपूर : वंजारीनगर पाणी टाकी ते अजनी रेल्वे पुलादरम्यान ३० मीटर रुंदीचा मार्ग प्रस्तावित आहे. २००५-०६ या वर्षात हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परंतु यात पुढे प्रगती झाली नाही. परंतु या मार्गावरील वाहतूक व नागरिकांची मागणी विचारात घेता सोमवारी मनपा व रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यात या रस्त्याचे मोजमाप करण्याचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, श्रावण हर्डीकर आदींनी प्रस्तावित मार्गाची पाहणी केली. या मार्गामुळे पूर्व व दक्षिण नागपुरातील नागरिकांना सुविधा होईल. या मार्गाचे काम रखडल्याने नागरिकांना फेऱ्याने जावे लागते. मागील काही वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला आहे. या मार्गाचे तातडीने रुंदीकरण करण्यात यावे, असे निर्देश दटके यांनी दिले.या मार्गामुळे रेल्वे विभागाच्या केंद्रीय विद्यालयाला बाधा निर्माण होणार होती. त्यामुळे रेल्वे विभागाने या मार्गाचा प्रस्ताव बदलण्याची सूचना तत्कालीन आयुक्त लोकेश चंद्र यांच्याकडे केली होती. त्यानंतर या प्रस्तावाचे काम रखडले होते. आता हे काम मार्गी लागण्याची आशा आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अध्यक्ष बाल्या बोरकर, नगरसेवक बाळू बांते, कार्यकारी अभियंता दिलीप जामगडे उपस्थित होते.(प्रतिनिधी)------------ फोटो ओळी... प्रस्तावित मार्गाची पाहणी करताता महापौर प्रवीण दटके, सुधाकर कोहळे, रमेश सिंगारे, श्रावण हर्डीकर व मान्यवर.