बिहारच्या छपरामध्ये विषारी दारूने अनेकांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत तब्बल 30 जणांचा मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काहींची दृष्टी गेली आहे. ग्रामस्थांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. असं असताना बिहारच्या एका मंत्र्याने वादग्रस्त विधान केलं आहे. "ताकद वाढवा मग सर्व काही सहन कराल" असं म्हटलं आहे. मंत्री असलेल्या समीर महासेठ यांनी हे विधान केलं आहे.
समीर महासेठ हे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांना दारूमुळे होणाऱ्या मृत्यूबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी "खेळून ताकद वाढवा, विषारी दारूही सहन करू शकाल" असं उत्तर दिलं आहे. तसेच बिहारमध्ये मिळाणारी दारू ही विष आहे. या विषारी दारूपासून वाचायचं असेल तर इम्युनिटी वाढवा असंही सांगितलं. महासेठ यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. आरजेडीचे आणखी एक नेते रामबली चंद्रवंशी यांनी देखील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूवरून थट्टा केली आहे.
"विषारी दारू प्यायल्यामुळे लोक मरत आहे. एखादा आजार किंवा दुर्घटनेने देखील लोक मरतच आहेत. त्यामुळे जगणं-मरणं ही काही मोठी गोष्ट नाही" असं चंद्रवंशी यांनी म्हटलं आहे. छपरा जिल्ह्यात विषारी दारूमुळे 30 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात विषारी दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढतच असली तरी जिल्हा प्रशासनाने याबाबत मौन बाळगले आहे. या प्रकरणी पिता-पुत्रासह तिघांना अटक करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. या घटनेवरून राजकारण तापले असून, भाजप सरकारच्या कालावधीतही अशा घटना घडल्या होत्या, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिले आहे.
सर्व मृतांनी सोमवारी रात्री उशिरा मद्यप्राशन केले होते. त्यानंतर मंगळवारी ते आजारी पडले. त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. या घटनेतील 15 जण अत्यवस्थ आहेत व इतर अनेक जण सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. अनेकांचे डोळे गेले आहेत तर काही जण प्राणास मुकले आहेत. या मुद्द्यावरून बिहार विधानसभेत विरोधकांनी जोरदार हंगामा केला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे नितीशकुमार कमालीचे संतापले. भाजप नेत्यांवर टीका करताने ते म्हणाले की, तुम्ही दारुडे आहात. यावर भाजपचे खासदार सुशील मोदी म्हणाले की, नितीश कुमार यांची स्मरणशक्ती गेली आहे. लहान-सहान गोष्टींमुळे त्यांना सतत राग येतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"