Andhra Pradesh:आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण या ताफ्यामुळे विशाखापट्टणममधील तीस विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा देण्यापासून वंचित राहावे लागले. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या ताफ्यामुळे अडवून ठेवल्यामुळे परीक्षेसाठी पोहोचू शकलो नसल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे आता आमचे वर्ष वाया गेल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटलं. मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या ताफ्यामुळे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि ३० हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेसाठी पोहोचण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे आता जेईई मेन्स २०२५ ची परीक्षा चुकवलेल्या या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. मात्र आता उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे विझाग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जारी करुन मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे अशी काही घटना घडल्याचा दावा फेटाळला.
विशाखापट्टणम येथे आयओएन डिजिटल झोन इमारतीत विद्यार्थ्यांची एक महत्त्वाची परीक्षा होती. परीक्षा सकाळी ८.३० वाजता सुरू होणार होती. एका महिलेने सांगितले की तिच्या मुलाला एनआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई मेन्स २०२५ ची परीक्षा द्यायची होती पण वाहतूक कोंडीमुळे त्याला पोहोचायला उशिरा झाला.
"आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो होता. उपमुख्यमंत्री पवन कल्याण आराकू येथे जात होते त्यामुळे वाहतूक थांबण्यात आली होती. अभिनेते आणि उपमुख्यमंत्र्यांना जाता यावं म्हणून रस्ता रिकामा करण्यात आला. सकाळी ७.५० वाजता आम्ही एनएडी जंक्शनवर पोहोचलो होतो. तिथून परीक्षेच्या ठिकाणी जाण्यासाठी तब्बल ४२ मिनिटे लागली. त्यामुळे उशीर झाला आणि त्यांना परीक्षेसाठी आत जाऊ दिले नाही," असे एका विद्यार्थ्याच्या आईने सांगितले.
"३० विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे.आम्ही वारंवार विनंती केली, पण आम्हाला आत जाऊ दिले नाही. जर परीक्षा केंद्राने पाच मिनिटांची सूट दिली असती तर माझ्या मुलीचे संपूर्ण वर्ष वाया जाण्यापासून वाचले असते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येत जात असतात. जर पोलिसांनी परीक्षा केंद्रावर थोडा वेळ वाढवून द्यायला सांगितला असता तर बरे झाले असते. माझ्या मुलीला दोन मिनिटे उशीर झाला म्हणून आत जाऊ दिले नाही," असं एका विद्यार्थिनीच्या पालकांनी सांगितले.
विशाखापट्टणम पोलिसांनी याप्रकरणी एक निवेदन जारी केले आहे. ताफ्यामुळे विद्यार्थ्यांना उशीर झाला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा सकाळी ८.४१ वाजता या परिसरातून गेला. विद्यार्थ्यांना उशिरा होण्याचा याच्याशी काहीही संबंध नाही. विद्यार्थ्यांना सकाळी ७ ते ८.३० च्या दरम्यान हॉलमध्ये पोहोचणे बंधनकारक होते, असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिले.