नवी दिल्ली : सुमारे ७५० दशलक्ष डॉलर खर्च करून भारतीय लष्करासाठी हलक्या वजनाच्या १४५ हॉवित्झर तोफा अमेरिकेकडून घेण्याच्या तसेच देशी बोफोर्स म्हणून विकसित करण्यात आलेल्या धनुष तोफांचे देशातच मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याच्या प्रस्तावांना संरक्षण मंत्रालयाकडून शनिवारी मंजुरी मिळाली. बोफोर्स घोटाळ्यानंतर लष्करासाठी या नव्या तोफा प्रथमच घेण्यात येणार आहेत. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘डिफेन्स अॅक्विझिशन कौन्सिल’च्या (डीएसी) बैठकीत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. बैठकीत सुमारे २८ हजार कोटी रुपयांच्या नव्या संरक्षणसामग्री खरेदीच्या प्रस्तावांवरही चर्चा झाली.अमेरिकेकडून घेतल्या जाणाऱ्या हॉवित्झर तोफांची २५ किमी अंतरावर मारा करण्याची क्षमता असून, चीन सीमेवर अरुणाचल प्रदेश आणि तिबेटमधील डोंगराळ भागात त्या तैनात करण्याची योजना आहे.संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या तोफा खरेदी करण्याचे स्वारस्य व्यक्त करणारे पत्र भारताने अमेरिकेस पाठविले होते. तो प्रस्ताव स्वीकार्य असल्याचे अमेरिकेने कळविले आहे. त्यासाठीच्या अटी व शर्तींवर ‘डीएसी’ने विचार केला व त्या मंजूर केल्या. आता अमेरिकेस तसे कळविले जाईल आणि खरेदी किंमतीचा पहिला हप्ता देण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल.या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, अमेरिकेची बीएई सिस्टिम्स ही कंपनी सुरुवातीच्या २५ तोफा पूर्णपणे जोडणी केलेल्या अवस्थेत भारताला पुरवेल. बाकीच्या १२० तोफा भारतात तयार करून त्यांची चाचणी व लष्कराच्या गरजेनुसार त्यात फेरबदल करण्याचे काम महिंद्रा डिफेन्स या खासगी कंपनीच्या भागिदारीत केले जाईल.सुरवातीच्या तयार तोफा पुरविण्याचा वेळ कमी करण्यासही ‘डीएसी’ने मंजुरी दिली. मात्र या तोफा नेमक्या केव्हा भारतात दाखल होतील, हे लगेच स्पष्ट झाले नाही.भारतीय लष्कराची युद्धसामुग्री जुनी व कालबाह्य झाली असल्याने नवी शस्त्रसामग्री घेण्यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला आहे. मात्र हे करीत असताना भारतातही प्रगत तंत्रज्ञान प्रसारित व्हावे व देशी उद्योगांना चालना मिळावी यासाठी विदेशी पुरवठादारांशी करार करताना त्यांनी ही युद्धसामग्री देशात उत्पादित करण्यासाठीही गुंतवणूक करावी, असा त्यांचा आग्रह आहे. याला ‘आॅफसेट’ व्यवहार म्हटले जाते. हॉवित्झर तोफांसंबंधीच्या अशा ‘आॅफसेट’ व्यवहाराची प्रक्रिया नंतर स्वतंत्रपणे हाताळली जाईल. त्यानुसार अमेरिकेन कंपनी भारतात सुमारे २०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्याची अपेक्षा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)देशी बोफोर्सच्या उत्पादनात समाधानकारक प्रगती- १९८०च्या दशकात बोफोर्स तोफा खरेदी करताना विदेशी उत्पादकाने तंत्रज्ञानाचेही हस्तांतरण केले होते. त्याचा उपयोग करून कोलकाता येथील आॅर्डनन्स फॅक्ट्री बोर्डाने ३८ किमी पल्ल्याच्या, ओढून नेता येणाऱ्या ‘धनुष’ तोफा विकसित केल्या आहेत. देशी बोफोर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तोफांचे उत्पादन करण्याच्या आघाडीवर समाधानकारक प्रगती होत असल्याचीही ‘डीएसी’ने नोंद घेतली.अशा तीन तोफा प्रत्यक्ष वापरकर्त्याच्या उपयोगासाठी ३० जूनपर्यंत उपलब्ध करून दिल्या जातील व आणखी ३ सप्टेंबरअखेर दिल्या जातील. त्यानंतर या तोफांचे देशातच मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाईल.
३० वर्षांनी लष्करास नव्या तोफा
By admin | Published: June 26, 2016 3:27 AM