भुवनेश्वर : मद्य उत्पादक कंपनीच्या विरोधात आयकर विभागाच्या झडतीमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक रोख ३०० कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. ओ़डिशातील बालंगीरमध्ये इतकी रोकड सापडली की, नोटा मोजण्यासाठी संपूर्ण पथक तैनात करण्यात आले असून, मोजणी टेबलवर ठिकठिकाणी पैशांचे ढिगारे दिसत आहेत. रोख एवढी मोठी आहे की, नोटा मोजण्याचे यंत्रही दमून जाईल.
बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड, तिचे प्रवर्तक आणि इतरांविरूद्धचे मॅरेथॉन छापे रविवारी पाचव्या दिवशीही सुरूच होते. सुत्रांनी सांगितले की, आतापर्यंत ३०० कोटींहून अधिक रोख रक्कम मोजली गेली आहे आणि मोजणी अद्याप सुरू आहे.
ढीगभर कागदपत्रे जप्त; कंपनीने बाळगले मौन...
झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांचा रांची आणि इतर ठिकाणचा परिसरही विभागाच्या झडतीदरम्यान रडारवर आला आहे. त्यांच्या घरातून किती रोख रक्कम आणि कोणती कागदपत्रे जप्त करण्यात आली, हे स्पष्ट झाले नाही. कंपनी आणि खासदार यांनी अद्याप आपली बाजू मांडलेली नाही.
आतापर्यंतच्या मोठ्या जप्ती
यापूर्वीच्या मोठ्या जप्तींमध्ये २०१९ मधील जीएसटी गुप्तचरांनी कानपूर - आधारित व्यावसायिकावर छापा टाकून २५७ कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती.
आयकर विभागाने जुलै २०१८ मध्ये तामिळनाडूमधील एका रस्ते बांधकाम कंपनीविरूद्ध छापे टाकून १६३ कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती.
३ सुटकेस दागिने जप्त; ५० जण मोजताहेत नोटा
रोख रकमेशिवाय दागिन्यांच्या ३ सुटकेस सापडल्या आहेत. ओडिशातील सरकारी बँकांच्या शाखांमध्ये जप्त केलेली रोख रक्कम जमा करण्यात येत आहे. या नोटा बहुतांश ५०० रुपयांच्या आहेत.
रोख मोजणीसाठी ५० कर्मचारी तैनात आहेत. याशिवाय अन्य कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले आहे.
बालंगीर जिल्ह्यातील कंपनीच्या आवारात ठेवलेल्या सुमारे ८-१० कपाटांमधून सुमारे ३०० कोटी रुपयांची रोकड सापडली आहे, तर उर्वरित रोकड टिटलागड, संबलपूर आणि रांची येथील ठिकाणांहूनही सापडली.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच एका खासदाराच्या घरातून एवढी मोठी रोकड जप्त करण्यात आली आहे. असे असले तरी ‘इंडिया’ आघाडी या भ्रष्टाचारावर गप्प आहे. ‘आमच्या विरूद्ध सरकारी तपास यंत्रणांचा वापर होत आहे,’ असे आरोप करीत सरकारविरूद्ध मोहीम का चालवली गेली, हे आता लक्षात येत आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराची सर्व गुपिते उघड होतील की काय, अशी भीती त्यांच्या मनात होती.
- अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री