नवी दिल्ली : गुवाहाटातील एका मंदिरातून गायब झालेला कोट्यवधींच्या खजिन्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि आसाम सरकारला नोटीस जारी केली आहे. गुवाहाटीतील दिसापूर विमानतळाजवळील एका चहाच्या मळ्यातील काली मंदिरातून ३०० कोटींची रोकड, ३०० किलो सोने आणि इतर मौल्यवान चीजवस्तू व २ एके-४७ रायफली गायब होऊन दीड वर्ष उलटले तरी खजिना सापडलेला नाही. या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे.लष्करातील माजी अधिकारी मनोज कुमार कौशल यांनी ही याचिका दाखल केली. त्यांनी असा दावा केला की, या मंदिरात ३०० कोटी रुपये, ३०० किलो सोने आणि २ एके-४७ रायफली होत्या. चहामळ्याचे मालक मृदुल भट्टाचार्य अन्य चहामळेवाल्यांकडून उल्फा संघटनेला आर्थिक मदत देण्यासाठी पैसा जमा करायचा. तथापि, २०१२मध्ये भट्टाचार्य आणि त्यांच्या पत्नीची हत्या करण्यात आली. लष्कराच्या हाती हा खजिना पडण्याआधीच १३ लोकांनी काही बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमताने खजिना ३१ मे २०१४ रोजी लंपास केला, असा आरोप याचिकेत आहे. यासंदर्भात अनेक राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर गुप्तचर विभागाने चौकशीचे आदेश दिले; परंतु, खजिन्याचा छडा लागलेला नाही. सीबीआय चौकशीसाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनाही पत्र लिहून काहीच झाले नाही, असेही कौशल यांनी यात म्हटले आहे.सहा आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे आदेशसरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने केंद्र आणि राज्य सरकारला सहा आठवड्यांच्या आत या नोटिशीला उत्तर देण्यास सांगितले आहे. याचिकेत या प्रकरणी काही धक्कादायक माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे मागच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंग यांना या प्रकरणात सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते.
३०० कोटींची रोकड, ३०० किलो सोने गेले कुठे?
By admin | Published: May 07, 2016 1:48 AM