- सुरेश डुग्गर लोकमत न्यूज नेटवर्क जम्मू : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडून जवळपास २५० ते ३०० अतिरेकी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली. उत्तरेकडे बर्षवृष्टी सुरू झाल्याने अतिरेक्यांच्या घुसखोरीची वाढती शक्यता लक्षात घेता सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) सतर्क झाले आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास आम्ही सज्ज असल्याचे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
अतिरेक्यांच्या गटाने पीरपंजालच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या लॉन्चपॅडवर आश्रय घेतला असून तेथून त्यांनी घुसखोरी करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. दरवर्षी बर्फवृष्टीच्या कालावधीत दहशतवादी कारवाया रोखण्यासह नियंत्रण रेषेच्या पलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा दलाकडून बंदोबस्त वाढविला जातो. घुसखोरी करण्यासाठी अतिरेक्यांनी त्यांचे केंद्र पीरपंजालच्या दक्षिणेकडे स्थलांतरित केले आहे. गुप्तचर विभागाच्या दिलेल्या अलर्टनंतर सुरक्षा दल सतर्क असून प्रत्येक घडामोडींकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. घुसखोरी करण्याचा अतिरेक्यांचा मनसुबा आम्ही हाणून पाडू, असा विश्वास बीएसएफचे महानिरीक्षक अशोक यादव यांनी व्यक्त केला.
नागरिकांशी योग्य समन्वयमागील काही वर्षांमध्ये काश्मिरी नागरिक आणि सुरक्षा दलांमध्ये योग्य समन्वय तयार झाला आहे. लोकांनीही आम्हाला सहकार्य केल्यास परिसरात आणखी शांतता प्रस्थापित करता येईल, असेही अशोक यादव म्हणाले.