अहमदाबाद - गुजरातच्या समुद्रात पुन्हा एकदा ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. अरबी समुद्रात जवळपास ३०० किलो ड्रग्स पकडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत १८०० कोटी रुपये आहे. गुजरात एटीएस आणि इंडियन कोस्ट गार्डच्या संयुक्त कारवाईत हे मोठे यश मिळालं आहे. इंडियन कोस्ट गार्डने १२-१३ एप्रिलच्या रात्री गुजरात एटीएससोबत मिळून किनारपट्टीवर १८०० कोटी रुपये किंमतीचे ३०० किलो ड्रग्स ताब्यात घेतले.
समुद्रात फेकून पळाले तस्कर
तस्करांनी आयसीजी जहाज पाहताच निर्बंध असलेले साहित्य समुद्रात फेकले आणि तिथून पळून गेले. कोस्ट गार्डच्या जवानांनी समुद्रातून ड्रग्सचा साठा जप्त करत पुढील चौकशीसाठी गुजरात एटीएसकडे सुपूर्द केले. ड्रग्स तस्करांविरोधात संयुक्त मोहीम आखून सरकारी यंत्रणांनी इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा पकडला.
सागरीमार्गे ड्रग्स आणि अन्य नशेचे पदार्थ तस्करी रोखण्यासाठी मागील वर्षी २०२४ मध्ये ऑपरेशन सागर मंथन सुरू करण्यात आले होते. त्यात NCB ऑपरेशन ब्रांचचे अधिकारी, भारतीय नौदलाची गुप्तचर यंत्रणेसह इंडियन कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएसचा समावेश करण्यात आला होता. या ऑपरेशन सागर मंथन अंतर्गत मागील वर्षी एकूण ३४०० किलो ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला होता. त्याशिवाय ११ इराणी नागरिक आणि १४ पाकिस्तानी नागरिकांनाही अटक करण्यात आली होती.
ऑपरेशन सागर मंथन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नशेच्या पदार्थाविरोधात सुरू केलेली मोहीम होती. या अंतर्गत विविध तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून संयुक्त कारवाई करण्यापासून सागरी मार्गे येणाऱ्या ड्रग्सच्या तस्करीला आळा घालण्यासाठी कारवाई केली जाते.