ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 06 - तुम्ही रेल्वे स्थानकावर आहात आणि तुम्हाला प्रचंड तहान लागली आहे, समोर पाणपोई आहे मात्र त्याची अस्वच्छता पाहून तुम्ही नाक मुरडता आणि मनात नसतानाही 10 ते 20 रुपये देऊन बाटलीबंद पाणी खरेदी करता...हा अनुभव सर्वच रेल्वे प्रवाशांना एकदा तरी आलेला असतोच. मात्र रेल्वेने प्रवाशांसाठी आता फक्त 1 रुपयात 300 मिली पाणी देण्याची सोय केली आहे.
रेल्वे प्रवाशांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी रेल्वे स्थानकांवर 'वॉटर पॉईंट' स्टॉल उभे करण्यात येणार आहेत. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयआरसीटीसी) याची जबाबदारी घेतली आहे. या माध्यमातून रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना कमी दरात स्वच्छ पाणी मिळणार आहे. महत्वाचं म्हणजे प्रवाशांना देण्यात येणा-या पाण्याची आरओ मेकॅनिझमच्या (पाणी स्वच्छ करण्याचं तंत्र) सात टप्प्यांमध्ये चाचणी करण्यात आली असून पुर्णपण जंतूमुक्त असणार आहे.
हे मशिन एटीएमप्रमाणे असणार -
हे मशीन एटीएम मशिनप्रमाणे असणार असून यामध्ये पैसे टाकल्यानंतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. या मशीनमध्ये दोन पर्याय असून एकामध्ये केवळ पाणी उपलब्ध होईल. पण जर तुमच्याकडे पाणी भरुन घेण्यासाठी काही साधन नसेल तर दुसर्या पर्यायामधून बाटलीबंद पाणी विकत घेऊ शकता. 300 मिली पाण्यासाठी प्रवाशांना 1 रुपया, अर्धा लिटर पाण्यासाठी 3 रुपये, एक लीटर पाण्यासाठी 5 रुपये, 2 लीटर पाण्यासाठी 8 रुपये आणि 5 लीटर पाण्यासाठी प्रवाशांना 20 रुपये मोजावे लागणार आहेत.
सध्या ही सेवा दिल्लीमधील आनंद विहार रेल्वे स्थानकावर आणि कानपूर रेल्वे स्थानकावर पुरवली जात आहे. रेल्वे मंत्रालयाने इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडकडे (आयआरसीटीसी) या मशीन बसविण्याची जबाबदारी सोपवली आहे. प्रवाशांची तहान भागवण्यासाठी रेल्वे स्थानकांवर पाणपोई उभारण्यात आल्या आहेत. मात्र या पाणपोईंची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी पाणपोई असल्या तरी त्याला नळ नसणे, अस्वच्छता अशा गोष्टींमुळे रेल्वे प्रवासी दहा ते वीस रुपये खर्च करुन बाटलीबंद पाणी खरेदी करतात.
मुंबईमध्ये देखील रेल्वे स्थानकांवर या वॉटर मशिन्स बसवण्यात येणार आहेत. आयआरसीटीसी बोरिवली आणि खार स्थानकात हाय-टेक वॉटर एटीएम मशीन बसवणार आहे. या मशीनची चाचणी झाल्यानंतर त्या रेल्वे स्थानकांवर बसवण्यात येतील. यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण मुंबई विभागात या मशीन बसवण्यात येणार आहेत.