चार वर्षात ३00 रेल्वे अपघात!
By admin | Published: August 11, 2015 12:03 AM
मालमत्तेचे नुकसान - भरपाईपोटी प्रशासनाला ९४५.५३ कोटींचा भुर्दंड
मालमत्तेचे नुकसान - भरपाईपोटी प्रशासनाला ९४५.५३ कोटींचा भुर्दंडअकोला : गेल्या चार वर्षांमध्ये देशभरात सुमारे ३00 रेल्वे अपघात घडले आहेत. विविध कारणांमुळे घडलेल्या या अपघातांमध्ये मालमत्तेचे झालेले नुकसान आणि अपघातातील मृत व जखमींना द्यावी लागलेली नुकसानभरपाई, यामुळे भारतीय रेल्वेला या कालावधित ९४५.५३ कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला.सन २0११-१२ ते २0१४-१४ या चार वर्षांमध्ये देशभरात घडलेल्या रेल्वे अपघातांची माहिती रेल्वे प्रशासनाने संकलित केली आहे. रेल्वे रुळावरून घसरल्याने झालेले अपघात, निकृष्ट स्लिपर्स आणि रुळांची निकृष्ट बांधणी (वेल्डिंग) या रेल्वे सुरक्षेला आव्हान देणार्या तीन प्रमुख कारणांमुळे घडलेल्या अपघातांची दखल या अहवालामध्ये घेण्यात आली आहे. याशिवाय नैसर्गिक कारणे आणि मानवी त्रुटी तसेच निकृष्ट झालेले रेल्वे पूल व रेल्वे उड्डाणपुलांमुळे घडलेल्या अपघातांचा यात प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. मानवरहित रेल्वे फाटकांवर आणि रेल्वे रूळ ओलांडताना घडलेल्या गंभीर अपघातांची नोंदही या सर्वेक्षणात घेण्यात आली आहे.सन २0११-१२ मध्ये ७७ गंभीर स्वरूपाचे रेल्वे अपघात घडले. त्यात ११५ जण मृत्युमुखी पडले, तर ५७४ जण गंभीर जखमी झाले. प्रशासनाला नुकसानभरपाईपोटी १४५.९४ कोटी मोजावे लागले, तर मालमत्तेच्या झालेल्या नुकसानापोटी १७४ कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागला.सन २0१२-१३मध्ये ६९ गंभीर अपघात घडले. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या ८१ जणांच्या कुटुंबियांना व ३00 जण गंभीर जखमींना रेल्वेला १७0.३५ कोटी नुकसानभरपाई द्यावी लागली. मालमत्तेच्या नुकसानीपोटी रेल्वेला १२९.१७ कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागला. सन २0१३-१४मध्ये देशभरात ७१ रेल्वे अपघात घडले. त्यात मृत्युमुखी पडलेल्या ५४ जणांच्या कुटुंबियांना व ११९ गंभीर जखमींना ११.९३ कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी लागली, तर ७४.४१ कोटींचा आर्थिक फटका मालमत्तेच्या नुकसानीपोटी रेल्वे प्रशासनाला सहन करावा लागला. सन २0१४-१५मध्ये देशात ८0 गंभीर रेल्वे अपघात घडले. त्यात १२३ जण मृत्युमुखी पडले, तर ३३५ जण गंभीर जखमी झाले. या वर्षात रेल्वेला मृत आणि जखमींच्या नुकसानभरपाईपोटी १२३.११ कोटी मोजावे लागले, तर मालमत्तेच्या झालेल्या नुकसानापोटी रेल्वेला ८१.९७ कोटी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला.