दागिने खरेदीला जाणं ही साधी बाब नाही. वेळ देऊन नीट निरखून-पारखूनच दागिन्यांची निवड आणि खरेदी होत असते. मन लावून खरेदी केलेला मोलाचा दागिना खोटा आहे हे कळतं तेव्हा पायाखालची जमीनच सरकते. असाच अनुभव चेरीश नावाच्या अमेरिकन महिलेला आला. दागिने खरेदीमध्ये आपण फसवले गेलो याची जाणीव झाल्याबरोबर चेरीश तडक अमेरिकेतून उठून भारतातीलराजस्थानातील जयपूर येथे आली. तिथे तिने बनावट दागिना देऊन फसवणूक करण्याविरुद्धची तक्रार दाखल केली तेव्हा संपूर्ण जगाला चेरीशच्या फसवणुकीच्या प्रकरणाचे गांभीर्य समजलं.
चेरीश ही अमेरिकन नागरिक. ती दोन वर्षांपूर्वी भारतात पर्यटनाला आली होती. जयपूरची मुशाफिरी करताना एका सुवर्ण पेढीतील दागिन्यावर तिचं मन जडलं. त्या दागिन्यावरची कारागिरी, त्यावरची विशिष्ट आकाराची रत्नं पाहून हा दागिना घ्यायचाच हे तिनं ठरवलं. दागिना, त्याची किंमत याबाबतीत प्रदीर्घ बोलणं झालं. दुकान मालकाने त्या दागिन्याची शुद्धतेचं हाॅलमार्क प्रमाणपत्र चेरीशला दाखवलं. दागिन्याच्या अस्सलपणाची, शुध्दतेची खात्री पटल्यानंतर चेरीशने तो दागिना खरेदी करण्याचं ठरवलं. या दागिन्याची किंमत होती तब्बल ६ कोटी रुपये. चेरीश तो दागिना घेऊन अमेरिकेला गेली. पुढच्या दोन वर्षात चेरीशने त्या दागिन्याची पूर्ण किंमत फेडली.
चेरीशने मोठ्या हौशीने घेतलेला हा मौल्यवान दागिना अमेरिकेतील एका प्रदर्शनात ठेवला होता. तिथे आपल्या दागिन्याची खूप वाहवा होईल असं चेरीशला वाटलं पण झालं उलटच. कौतुक राहिलं दूर चेरीशला त्या प्रदर्शनात दागिन्याचं खर रूप समजलं. मौल्यवान रत्नं असलेला तो दागिना खोटा आहे हे समजल्यावर चेरीश हादरलीच. ६ कोटी रुपयांना घेतलेला तो दागिना फक्त ३०० रुपयांचा होता. ज्याने फसवलं तो सातासमुद्रापार होता. पण चेरीश शांत बसणाऱ्यातली नव्हती. तिने भारतात फोनाफोनी करून आपली फसवणूक झाल्याचं कळवलं. फोनवरूनच ज्याने फसवणूक केली त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. भारतातील अमेरिकन दूतावासाला फोन केला. त्यांना या तपासात लक्ष घालण्याची विनंती केली. फोनवरून तपासाची सूत्रं हवी तशी हलत नाहीत म्हटल्यावर चेरीश तिला फसवणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी भारतात आली. तिने दागिना जयपूरमधील इतर जवाहिरांकडून तपासून घेतला. तेव्हा त्यांनीही हा दागिना खोटा असल्याचं सांगितलं. खरेदीचे पुरावे घेऊन तिने पोलिसांत तक्रार केली. चेरीशला खोटा दागिना कोट्यवधी रुपयांना विकणाऱ्या बाप-लेकाच्या जोडीने एव्हाना पळ काढला होता. आता पोलिसांनी पळून गेलेल्या सुवर्ण व्यापाऱ्यांवर लूक आऊटची नोटीस काढली आहे.
चेरीशच्या विनंतीनुसार अमेरिकन दूतावासाने या प्रकरणात लक्ष घातल्याने हे प्रकरण जाहीर झालं. जयपूरच्या या सुवर्ण बाजारात पर्यटक मोठ्या संख्येने येतात. काही भामट्यांमुळे जयपूरचा सोनेबाजार बदनाम व्हायला नको अशी कळकळ येथील अनेक सुवर्ण व्यापाऱ्यांना वाटत आहे. जयपूरमधील दागिन्यांवरची कारागिरी, दागिन्यांमधील वैशिष्ट्यपूर्ण रत्नं यामुळे देशातच नाही तर जगभरात जयपूरचा सोनेबाजार प्रसिद्ध आहे हे जितकं खरं तितकंच या बाजारात ग्राहकांना विशेषतः परदेशी ग्राहकांना फसवून लुटणारे लबाडही खूप आहेत. सुवर्ण खरेदी, दागिने खरेदी यात फसवले गेलेले ७०-८० टक्के परदेशातील लोक साधी तक्रारही करत नाहीत. पण चेरीश मात्र खमकी निघाली. सध्या तिची फसवणूक करणारे व्यापारी पिता-पुत्र हे पळून गेलेले आहेत. चेरीशची फसवणूक करणाऱ्या या दोघांनी जयपूरमधील उच्चभ्रू वस्तीत ३ कोटी रुपये खर्चून एक फ्लॅट विकत घेतल्याची ही चर्चा आहे. गुन्हेगार सापडून त्यांना शिक्षा होईल तेव्हा होईल; पण चेरीशच्या प्रकरणामुळे हाॅलमार्क आहे म्हणून तो दागिना शुद्ध आणि खराचं आहे, हे काही खरं नाही. बनावट हाॅलमार्क
देऊनही दागिने विकले जातात याचा धडा सर्वांनाच मिळाला आहे. सोने-दागिने खरेदी करण्यापूर्वी काय काय काळजी घ्यायला हवी, इथे फसवणूक कोणकोणत्या मार्गाने होते, होऊ शकते याचा नीट अभ्यास केलेला बरा !
दागिना खोटा आणि आरोपही खोटाच ! चेरीशला जो दागिना ६ कोटी रुपयांना विकला होता तो सोन्याचा मुलामा दिलेला चांदीचा खोटा दागिना निघाला. त्यात साधे मूनस्टोन्स आहेत. त्यातील सोनंही १४ कॅरेट नसून केवळ ३ कॅरेट आहे हे दागिना तपासल्यावर लक्षात आलं. चेरीशने फसवणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली तेव्हा चेरीशच दागिना घेऊन पळून गेल्याचा दावा लबाड व्यापाऱ्यांनी करुन पाहिला; पण पेढीवर असलेल्या सीसीटीव्हीचं फुटेज तपासून हा आरोप खोटा असल्याचं लगेचच सिद्ध झालं.