श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात ८ जुलैपासून ३,००० पेलेट काडतुसे डागण्यात आली. प्रत्येक काडतुसात धातूचे ४५० छर्रे असतात. हिंसाचारादरम्यान सशस्त्र दले आणि निदर्शक दोघेही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलत असल्यामुळे स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग प्रोटोकॉल (एसओपी) पाळणे कठीण होते, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाला दिली. पेलेट गन (छर्ऱ्याची बंदूक)च्या वापरावर बंदीची मागणी करणाऱ्या याचिकेवर आपले म्हणणे मांडताना सीआरपीएफने गेल्या महिनाभरात खोऱ्यात वापरण्यात आलेल्या दारूगोळ्याचा तक्ता न्यायालयासमोर ठेवला. गेल्या महिन्यात हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वनी मारला गेल्यानंतर पंप अॅक्शन गन्सद्वारे .९ नंबरची ३,७६५ काडतुसे डागण्यात आली. एका काडतुसात सुमारे ४५० छर्रे असतात. म्हणजे सीआरपीएफने निदर्शकांवर ११ आॅगस्टपर्यंत १३ लाख छर्रे डागले. खोऱ्यातील विद्यमान निदर्शनांदरम्यान जमावाला नियंत्रित करण्यासाठी आपण कमी घातक आणि अजिबात घातक नसलेल्या १४ प्रकारच्या दारूगोळ्यांचा वापर केला. यात ओलेओरेसिन ग्रेनेड, पेपर बॉल्स, स्टन ग्रेनेडस् आणि इलेक्ट्रिक शेल्स यांचा समावेश होता, असे सीआरपीएफने न्यायालयाला सांगितले. ८ जुलै ते ११ आॅगस्टदरम्यानच्या निदर्शनादरम्यान अश्रुधुराच्या ८,६५० नळकांड्यांसह २,६७१ प्लास्टिक छर्यांचा वापर करण्यात आल्याचेही सीआरपीएफने न्यायालयाला सांगितले. ही माहिती केवळ सीआरपीएफने वापरलेल्या दारूगोळ्याची असून, जमावाला आवर घालण्यासाठी पोलिसांनी किती दारूगोळा वापरला याची माहिती त्यांनी अद्याप सादर केलेली नाही. एसओपीचे पालन करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न केला. तथापि, परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. टोकाच्या स्थितीत जमावाला आवर घालण्यासाठी शस्त्र वापरण्याची वेळ आलीच तर समोरच्यांच्या छातीखालील भागांवर मारा करावा, असे एसओपी सांगते; परंतु हिंसक निदर्शक, त्यांचे सतत हलणे व स्फोटक परिस्थिती यामुळे एसओपीचे पालन करणे शक्य झाले नाही, असेही सीआरपीएफने सांगितले. (वृत्तसंस्था)
३,००० पेलेट काडतुसे डागली
By admin | Published: August 19, 2016 5:16 AM