नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाभिमानी भारतासाठी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. बुधवारी याच्या पहिल्या टप्प्यातील योजनांची घोषणा करण्यात आली. आज दुसऱ्या टप्प्यातील योजनांची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. यामध्ये अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी ३० हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद केली असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
निर्मला सीतारामन यांनी अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी 30 हजार कोटींची योजनेची घोषणा केली आहे. नाबार्डकडून या योजनेतील पैसे जिल्हा बँका आणि ग्रामीण बँकाना दिले जातील. यानंतर या बँकांकडून अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांना पैसे वाटप केले जाणार आहे. या योजनेचा देशातील जवळपास ३ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे. तसेच याचा समन्वय राज्यसरकार साधतील असं निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. याचसोबत पशुपालक आणि मच्छीमार यांच्यासाठीही योजना लवकरच आणणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.
बुधवारी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी महत्त्वाच्या घोषणा करणाऱ्या अर्थमंत्र्यांनी आज स्थलांतरित मजूर, शेतकरी, फेरीवाल्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. देशातील 3 कोटी शेतकऱ्यांनी 4 लाख 22 हजार कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता त्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी तीन महिन्यांचा दिलासा देण्यात आला आहे. किसान क्रेडीट कार्डद्वारे 25 हजार कोटी रुपये उपलब्ध करण्यात आल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Atmanirbhar Bharat Abhiyan देशात कुठेही रेशनचे धान्य मिळणार; कामगारांना परवडणारी भाडेकरारावर घरे