नवी दिल्ली: हवाई दलाच्या विमानांचे वारंवार होणारे अपघात भारताच्या दृष्टीनं चिंतेचा विषय झाला आहे. 2015-16 पासून भारतीय हवाई दलाची 33 विमानं अपघातग्रस्त झाली आहेत. यामध्ये 19 लढाऊ विमानांचा समावेश आहे, अशी आकडेवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. रशियाकडून खरेदी करण्यात आलेलं एएन-32 विमान काही दिवसांपूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये अपघातग्रस्त झालं. त्याचीही माहिती राजनाथ यांनी सभागृहाला दिली. हवाई दलाच्या एएन-32 विमानाला 3 जून रोजी अपघात झाला. यामध्ये हवाई दलाच्या 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर एएन-32 विमानाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र एएन-32 विमानं अतिशय उपयुक्त असून ती यापुढेही हवाई दलाच्या सेवेत असतील, असं राजनाथ सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी 2015-16 पासून झालेल्या अपघातांचीही माहिती दिली. 2015-16 या वर्षात हवाई दलाची चार लढाऊ विमानं आणि प्रत्येकी एक हेलिकॉप्टर, वाहतूक विमान आणि प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान कोसळलं, असं राजनाथ यांनी सांगितलं.
चिंताजनक! 2015 पासून हवाई दलाची 33 विमानं अपघातग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 10:55 IST