नवी दिल्ली : हरयाणातल्या हिसार जिल्ह्यातील मिर्चपूर येथे ६० वर्षांच्या वृद्ध दलित आणि त्याच्या अपंग मुलीला जीवंत जाळल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने एकूण ३३ जणांना दोषी ठरविले असून, त्यातील १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. एप्रिल २०१०मध्ये घडलेल्या या प्रकरणाचा न्या. एस. मुरलीधर व न्या. आय. एस. मेहता यांच्या खंडपीठाने निकाल दिला.
दिल्ली हायकोर्ट; १२ जणांना जन्मठेप
देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली, तरी दलितांवरील अत्याचार थांबायला तयार नाहीत. आपल्या समाजात समता व बंधुता यांचा अभाव आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा अंतिम मसुदा सादर करताना म्हटले होते. त्याची आठवण उच्च न्यायालयाने निकालपत्रात करुन दिली. मिर्चपूर येथे जाट समुदायाच्या लोकांकडून वाल्मिकी समाजातील लोकांच्या घरांवर जाणूनबुजून हल्ले चढविले गेले, असेही न्यायालयाने म्हटले. दोषींकडून जो दंड वसूल केला जाईल त्याची रक्कम मिर्चपूर प्रकरणात बळी पडलेल्यांच्या वारसदारांना किंवा अन्य जखमी लोकांना भरपाई म्हणून दिली जाईल.