मुंबई : प्रत्यक्ष बँकेत येऊन व्यवहार करण्यापेक्षा ते व्यवहार एटीएमच्या माध्यमातून करण्याविषयी बँका जरी आग्रही असल्या तरी देशात असलेल्या एकूण एटीएमपैकी प्रत्येकी तिसरे मशिन हे बंद असल्याचा निष्कर्ष भारतीय रिझर्व्ह बँकेनेच एका अभ्यासाअंती काढला असून यासंदर्भात बँकांचे कान उपटले आहेत. एटीएमसंदर्भात सातत्याने वाढणाऱ्या तक्रारींचे प्रमाण लक्षात घेत यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने स्वत:हून पुढाकार घेत देशातील सुमारे चार हजार एटीएमची तपासणी केली. सर्वेक्षणासाठी चार हजारांचा आकडा हा मोठा असून याआधारेच हा निष्कर्ष काढल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या अभ्यासानंतर रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात बँकांनी बारकाईने लक्ष देत सर्व मशिन्स नीट व व्यवस्थित सुरू राहतील याबाबत दक्षता घेण्याचे कठोर निर्देश दिले आहेत. तसेच रिझर्व्ह बँक या मशिनच्या स्थितीचा नियमितपणे आढावा घेत राहील, असेही शिखर बँकेने बँकांना कळविले आहे. एटीएम मशिनसंदर्भात ग्राहकांच्या अनेक तक्रारी रिझर्व्ह बँकेत दाखल झालेल्या आहेत. यापैकी प्रामुख्याने सांगायचे झाल्यास, अनेक वेळा मशिन बंद असल्यामुळे ग्राहकांना आपले व्यवहार पूर्ण करणे शक्य होत नाही. तसेच अनेक वेळा विविध एटीएममधून ५०० रुपये आणि एक हजार रुपयांच्याच नोटा असल्यामुळे ग्राहकांना कमी पैसे काढायचे असले तरी या प्रकारामुळे जास्त पैसे काढावे लागतात. तसेच ज्या एटीएममध्ये कॅश डिपॉझिट करण्याची व्यवस्था आहे, त्यातील बहुतांश मशिन्स बंद असल्याचे आढळून येते. अनेक ठिकाणी तर बँकांची दैनंदिन कामकाजाची वेळ संपल्यावर ते मशिनही बंद असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ग्राहकांना पुढच्या मशिनपर्यंत पायपीट करावी लागते. एटीएमच्या प्रसारासाठी बँका मोठ्या प्रमाणावर आग्रही आहेत, याचे कारण म्हणजे एटीएमवरून होणाऱ्या व्यवहारांमुळे बँकेच्या व्यवहारखर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होते. यासंदर्भात मध्यंतरी बँकिंग उद्योगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जर एखाद्या ग्राहकाने बँकेत येऊन व्यवहार केला तर त्याकरिता बँकेला साधारणपणे (शहरनिहाय) सरासरी ६५ रुपये खर्च येतो. हाच व्यवहार जर त्या ग्राहकाने एटीएमच्या माध्यमातून केला तर त्या व्यवहाराकरिता ३५ रुपयांच्या आसपास खर्च येतो. एटीएमची संख्या दोन लाखांच्या उंबरठ्यावरदेशातील तळागाळातील जनतेपर्यंत वित्तीय व्यवस्थेचे फायदे पोहोचविण्याच्या दृष्टीने वित्तीय समायोजनाचे धोरण राबविण्यात एटीएमचे योगदान मोलाचे मानले जाते. पण सध्या देशातील लोकसंख्येच्या तुलनेत एटीएमची संख्या अतिशय नगण्य आहे. सरकारी आणि खासगी बँकांच्या एटीएमची एकत्रित संख्या ही जेमतेम दोन लाखांच्या घरात आहे. त्यामुळे त्यातही मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. मध्यंतरी सर्व बँकांचे व्यवहार पार पाडले जातील अशा ‘व्हाइट लेबल’ एटीएमला सरकारने परवानगी दिली होती. मात्र, त्यात फारसा नफा नसल्याने अनेक कंपन्यांनी यामधील गुंतवणूक काढून घेतली आहे. एटीएम बंद असल्यास बँकांवर होणार कारवाईएटीएम मशिनची देखभाल नीट न केल्यास व ती ठरावीक मुदतीपेक्षा जास्त काळ बंद राहिल्यास बँकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेने अहवालाच्या निमित्ताने दिले आहेत.
देशात ३३ टक्के एटीएम निकामी
By admin | Published: May 26, 2016 2:06 AM