चंदीगड - भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्ये वाढ होताना दिसत आहे. या व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळांवर तपासणी केली जात आहे. मात्र, असे असतानाच कोरोना प्रभावित देशांमधून आलेले तब्बल 335 प्रवासी कोरोना व्हायरस स्क्रिनिंगच्या भीतीने बेपत्ता झाले आहेत. या प्रवाशांची यादी पंजाब सरकारने केंद्राकडे पाठवली आहे.
परदेशातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 14 दिवसांसाठी विलगिकरण कक्षात ठेवणे आवश्यक आहे. आतापर्यंत अटारी-वाघा सीमेवरून आलेल्या 6 हजार 892 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी एकाला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.
आता मॉल, जीम, चित्रपटगृहे आणि हॉटेल्सदेखील बंदपंजाब सरकारने शाळांना सुटीची घोषणा केल्यानंतर आणखी एक पाऊल उचलले आहे. आता पंजाब सरकारने मॉल, जीम, चित्रपटगृहे, हॉटेल्स आणि शॉपिंग मॉलही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले असून दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
राज्यातही शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा आणि राजकीय कार्यक्रमांची परवानगी रद्द -
महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 20 वर रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रांतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. याशिवाय, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा आणि राजकीय अशा सर्व कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आली आहे.