हिमाचल प्रदेशमध्ये राज्यसभा निवडणुकीनंतर भूकंप झाला आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या मुलाने बंडखोरी केली आहे. विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अशातच राज्यसभेचा निकाल धक्कादायक लागला असून काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने मातब्बर नेते प्रसिद्ध कायदेतज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांना पराभूत व्हावे लागले आहे.
काँग्रेसचे सिंघवी आणि भाजपाचे हर्ष महाजन यांना प्रत्येकी ३४-३४ मते पडली होती. यामुळे निकालासाठी ईश्वरी चिठ्ठीचा पर्याय निवडण्यात आला. भल्या भल्या केसेस जिंकणारे सिंघवी यांच्या नावाची चिठ्ठी निवडली गेली. परंतु, नशीबाचा फेरा एवढा विचित्र होता की नावाची चिठ्ठी येऊनही सिंघवी हरले होते.
तुम्ही म्हणाल असे कसे झाले... चिठ्ठी जिंकली तरी सिंघवी कसे काय हरले... इकडे ग्राम पंचायत, जिल्हा परिषद किंवा अन्य निवडणुका असोत त्यामध्ये समसमान मते मिळाली तर ईश्वरी चिठ्ठी म्हणजेच ड्रॉ काढला जातो. यामध्ये ज्याच्या नावाची चिठ्ठी आली तो जिंकला असे जाहीर केले जाते. परंतु इथे उलटे आहे. ही राज्यसभेची निवडणूक होती.
राज्यसभेच्या निवडणुकीत नियम वेगळे आहेत. निवडणूक आचार नियम, 1961 च्या नियम 75(4) अंतर्गत उमेदवारांना समान मते मिळाल्यास ड्रॉ काढला जातो. रिटर्निंग ऑफिसर उमेदवारांची नावे असलेल्या स्लिप एका बॉक्समध्ये ठेवतात. हा बॉक्स हलविला जातो. यानंतर चिठ्ठी काढली जाते. इथपर्यंत सर्व प्रक्रिया सारखीच असते. परंतु यापुढे सगळे बदलते. ज्याच्या नावाची चिठ्ठी य़ेते त्याला पराभूत असे जाहीर केले जाते. नेमके सिंघवींच्या बाबतीत हेच घडले. यामुळे नशीब असूनही पराभव पत्करावा लागला आहे.