अमित शाहांचा विरोध करण्यासाठी एक लाख कार्यकर्त्यांद्वारे 35 KMची 'काळी भिंत'!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 09:15 AM2020-01-07T09:15:16+5:302020-01-07T09:23:28+5:30
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे.
नवी दिल्ली : येत्या 15 जानेवारीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केरळच्या दौऱ्यावर जातील, त्यावेळी त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. केरळमधील इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML) या पार्टीने अमित शाह यांचा विरोध करण्यासाठी एक लाख कार्यकर्त्यांद्वारे 'काळी भिंत' उभारण्याची योजना आखली आहे.
केरळमधील कोझिकोडमध्ये 15 जानेवारीला अमित शाह यांच्या उपस्थित नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) समर्थनार्थ रॅली काढण्यात येणार आहे. त्यामुळे इंडियन युनियन मुस्लीम लीगने (IUML) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी योजना आखली आहे. रिपोर्टनुसार, इंडियन युनियन मुस्लीम लीगच्या युवा ब्रिगेडचे कार्यकर्ते कालिकट एअरपोर्ट ते वेस्टहिल हेलिपॅडच्या दरम्यान 35 किलोमीटरपर्यंत मानवी साखळी तयार करणार आहेत. हे सर्व कार्यकर्ते काळे कपडे परिधान करणार आहेत. इंडियन युनियन मुस्लीम लीगने सांगितले की, "सर्व कार्यकर्ते काळे कपडे परिधान करून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करतील. विरोध प्रदर्शन दुपारी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान करण्यात येणार आहे."
दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणारी इंडियन युनियन मुस्लीम लीग पहिली राजकीय पार्टी आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे.