नवी दिल्ली : ‘भारत जोडो यात्रा भारताची उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष मूल्ये जतन करण्याच्या उद्देशाने होती. देशातील उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांवर भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्याकडून आक्रमण होत आहे,’ असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात्रेच्या समारोपप्रसंगी केला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टीमध्ये संपली. शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये समारोप समारंभात राहुल गांधी यांनी ३५ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला.
त्यांना दु:ख कळेल कसे?राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, इथे आम्ही ४ दिवस फिरलो, भाजपचा कोणताही नेता असे फिरू शकणार नाही याची मी खात्री देतो. जम्मू-काश्मीरचे लोक त्यांना फिरू देणार नाहीत म्हणून नाही, तर त्यांना भीती वाटते म्हणून.’ ‘मला जम्मू-काश्मीरच्या लोकांना आणि लष्कर-सुरक्षा दलांना काही सांगायचे आहे. मला हिंसा समजते. मी हिंसा अनुभवली आहे. ज्याने हिंसा पाहिली नाही त्यांना हे समजणार नाही. काश्मिरी व सैनिकांप्रमाणेच मी माझ्या प्रियजनांना गमावल्याचे दुःख सहन केले. ही वेदना मोदी-शहा समजू शकत नाही,’ असे भावुक भाषण राहुल गांधी यांनी केले. यावेळी प्रियांका गांधी, मेहबूबा मुफ्तींची भाषणे झाली.
माझ्यावर हँडग्रेनेड फेकले नाही, प्रेम दिले‘मी जम्मूहून काश्मीरला जात होतो तेव्हा मला इशारा देण्यात आला की, तुमच्यावर ग्रेनेड फेकले जाईल. मी म्हणालो, या टी-शर्टचा रंग बदला, लाल करा. जे होईल ते पाहू; पण मला जे वाटले तेच झाले. जम्मू-काश्मीरच्या लोकांनी माझ्यावर हँडग्रेनेड फेकले नाही, त्यांनी मला उघड्या हातांनी प्रेम दिले,’ असे राहुल गांधी म्हणाले.
असे फोन कॉल थांबावेत...‘मला हिंसा समजते. आजीला गोळी घातली ती जागा मी पाहिली, तेव्हा मी १४ वर्षांचा होतो. प्रियजन गमावले की हृदयात काय होते, त्यांना फोन आल्यावर कसे वाटते, हे मला, माझ्या बहिणीला समजते. असे फोन कॉल्स थांबले पाहिजेत, हेच आमचे उद्दिष्ट आहे, या देशाचा पाया तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विचारधारेच्या विरोधात एकत्र उभे राहू या,’ असेही राहुल गांधी म्हणाले.
हिमवर्षावाचा आनंद श्रीनगरमध्ये सकाळपासून बर्फवृष्टी झाली. पण कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही. सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. भाषणादरम्यान बर्फवृष्टी यामुळे राहुल गांधींनी ‘फेरन’ ही काश्मिरी टोपी घातली. समारोपानंतर राहुल व प्रियांका यांनी एकमेकांवर बर्फ फेकत आनंद लुटला.