रायबरेलीत काँग्रेसला धक्का! ३५ नेत्यांचा राजीनामा; पक्षातील कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर
By देवेश फडके | Published: January 9, 2021 04:14 PM2021-01-09T16:14:47+5:302021-01-09T16:17:40+5:30
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा गड मानल्या जाणाऱ्या रायबरेलीतील ३५ नेत्यांनी आपला राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशातील आगामी पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे.
रायबरेली :काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा गड मानल्या जाणाऱ्या रायबरेलीतील ३५ नेत्यांनी आपला राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशातील आगामी पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे.
काँग्रेस पक्षातील ३५ पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. पक्षात आता जुन्या सहकाऱ्यांना डावलले जात आहे. पक्षातील जुन्या पदाधिकारी तसेच नेत्यांची दखलही घेतली जात नाही, असा आरोप करण्यात आला आहे. रायबरेली हा सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे.
अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांमुळे रायबरेलीमधील पक्षाची अवस्था अमेठीसारखी होईल, असा दावा या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी वृत्त फेटाळत त्यांच्याकडे कोणतेही राजीनामे आलेले नाहीत, असे सांगितले. काही दिवसांपूर्वी काँग्रेस जिल्हाधिकाऱ्यांनी एक नवीन कार्यकारिणी स्थापन केली होती. यानंतर पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांचा नव्या कार्यकारिणीला विरोध करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षासाठी अनेक जण कार्यरत आहेत. पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नव्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवली जात आहे. तर दुसरीकडे, ३० वर्षांपासून पक्षासाठी कार्यरत असणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. जिल्हाध्यक्ष स्वतःच्या चुका आणि कमतरता झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, अस दावा प्रदेश सचिव आणि काँग्रेस कमिटी सदस्य शिव कुमार पांडे यांनी यावेळी केला.
तत्पूर्वी, माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अमेठीतून निवडून आलेल्या केंद्रीयमंत्री स्मृति इराणी यांनी आता २०२४ मध्ये रायबरेलीत भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत काँग्रेसच्या ३५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.