नवी दिल्ली : काश्मीरमधील तणावपूर्ण परिस्थितीचा फायदा घेऊन 35 दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर विभागानं याबद्दलची माहिती केंद्र सरकारला दिली आहे. दहशतवादी गटागटानं काश्मीरच्या विविध भागांमध्ये घुसखोरी करु शकतात, अशी माहिती गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिली आहे. रमजानच्या काळात केंद्र सरकारनं दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई थांबवली आहे. मात्र या कालावधीत दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. याबद्दलचा अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे. गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी चार गट करुन नियंत्रण रेषा ओलांडण्याच्या तयारीत आहेत. लष्कर-ए-तोयबाचे 18 दहशतवादी काश्मीरच्या कुपवाडामधील माछिल सेक्टरमध्ये घुसखोरी करु शकतात. हे दहशतवादी दोन गटांच्या माध्यमातून घुसखोरी करुन लष्कराच्या तळांना लक्ष्य करु शकतात. याशिवाय लष्कर-ए-तोयबाचे 8 दहशतवादी नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करु शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूंछ सेक्टरमध्ये सहा दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करु शकतात. गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर या दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यात अपयश आलं, तर ते आयईडीचा स्फोट घडवू शकतात. पूंछमधील बिजी सेक्टरमध्ये 3 दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न होऊ शकतो. घुसखोरी करुन सुरक्षा दलांकडून शस्त्रं चोरण्याची योजना दहशतवाद्यांनी आखली आहे. काश्मीरमधील तणावपूर्ण वातावरणात भर घालण्याचा दहशतवाद्यांचा मानस आहे.
35 दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 11:32 PM