मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेंजुषा मेनन हिने जीवन संपवले. ती घरात लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ माजली. ३५ वर्षीय अभिनेत्रीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिरुअनंतपुरममधील श्रीकार्यम येथील एका अपार्टमेंटमध्ये तिचे घर आहे. सोमवारी सकाळी बराच वेळ खोली बंद राहिल्याने कुटुंबीयांना संशय आला, नंतर दरवाजा जबरदस्तीने उघडला असता ती लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. रेंजुषाने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
माहितीनुसार, रेंजुषा तिच्या पतीसोबत फ्लॅटमध्ये राहत होती आणि आर्थिक संकटाचा सामना करत होती. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास श्रीकार्यम पोलीस ठाण्यात तिच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आत्महत्या करण्यापूर्वी काही तास आधी रेंजुषा मेननने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती खूप आनंदी दिसते.
रेंजुषा मेनन ही कोची येथील रहिवासी होती. तिने एका टीव्ही चॅनेलवर अँकर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि 'श्रीत्री' या टीव्ही शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर अभिनयाची सुरुवात केली आणि 'निझालत्तम', 'मगलुदे अम्मा' सारख्या इतर प्रोजेक्टमध्ये काम केले. ती ‘सिटी ऑफ गॉड’ आणि ‘मेरीकुंडोरू कुंजाडू’ या नामांकित चित्रपटांमध्ये दिसली होती.