नवी दिल्ली : कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लवकरच पक्षाची कमान सांभाळणार आहेत. दुसरीकडे राहुल गांधींचे चुलत भाऊ आणि भाजपा खासदार वरूण गांधी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी वरूण गांधी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांनंतर वरूण गांधी यांना मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते, पण त्यांना डावलून योगी आदित्यानाथ यांच्याकडे सुत्रं सोपवण्यात आली. तेव्हापासून वरूण नाराज असल्याचं वृत्त आहे. भाजपामध्ये वरूण गांधी यांना डावललं जात असल्याचं कॉंग्रेसचे ज्येष्ठ मुस्लिम नेता हाजी जमीलुद्दीन इंडिया टुडेसोबत बोलताना म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींव्यतिरिक्त भाजपाच्या कोणत्याही नेत्याला ‘मन की बात’ करू दिली जात नाही. वरूण हे नेहमी त्यांची भूमिका सडेतोड मांडतात, त्यामुळे त्यांना पक्षात सातत्याने दुर्लक्षित केलं जातं. उत्तर प्रदेशात सत्ता आल्यानंतर भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी वरूण गांधींना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली होती , पण त्यांना डावलून योगी आदित्यनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आलं, असं जमीलुद्दीन म्हणाले. जमीलुद्दीन यांच्याशिवाय कॉंग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेता हाजी मंजूर अहमद यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकांआधी वरूण गांधी कॉंग्रस पक्षात प्रवेश करू शकतात असं म्हटलं आहे. प्रियंका गांधी आणि वरूण गांधी यांच्यातील संबंध चांगले आहेत, त्यामुळे वरूण गांधींच्या कॉंग्रेस प्रवेशात प्रियंका गांधी महत्वाची भूमिका बजावू शकतात, आणि प्रियंका गांधींच्या समर्थनासह वरूण आणि राहुल गांधी यांचं स्थान पक्षात भक्कम करता येऊ शकते असं अहमद म्हणाले. जर वरूण यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला तर 35 वर्षानंतर नेहरू-गांधी कुटुंब पुन्हा एकत्र आलेलं पाहायला मिळेल.
35 साल बाद! नाराज वरूण गांधी धरणार राहुलचा 'हात', प्रियंका करणार मध्यस्थी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 11:52 AM