८० अधिकाऱ्यांच्या ९ टीम, २४ तास नोटा मोजणी; आतापर्यंत ३५१ कोटींची रोकड सापडली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 08:22 AM2023-12-11T08:22:45+5:302023-12-11T08:28:38+5:30
साहू ग्रुपवर करचोरीचा आरोप आहे. यातूनच ६ डिसेंबरला आयकर विभागानं ही कारवाई सुरू केली.
नवी दिल्ली - काँग्रेस खासदार आणि व्यावसायिक धीरज साहू यांच्या अनेक ठिकाणांवर आयकर विभागाने धाड टाकत कारवाई केली आहे. ५ दिवसांपूर्वी झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील ९ ठिकाणी आयकर विभागानं छापा टाकला. या धाडीत आतापर्यंत ३५१ कोटींची रोकड सापडली आहे. ही कारवाई सर्वात मोठा रेकॉर्ड आहे कारण आजतागायत इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्याची कुठलीही कारवाई झाली नाही.
साहू ग्रुपवर करचोरीचा आरोप आहे. यातूनच ६ डिसेंबरला आयकर विभागानं ही कारवाई सुरू केली. १७६ बॅगेत ही रोख रक्कम ठेवली होती. यातील नोटा अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मोजल्या जात आहेत. रविवारी संध्याकाळी भारतीय स्टेट बँकेचे विभागीय संचालक भगत बेहरा यांनी सांगितले की, ही रोकड मोजण्यासाठी आयकर विभाग आणि विविध बँकांचे ८० अधिकारी आणि ९ पथके गुंतले आहेत.हे सगळे २४ तास काम करत आहेत. त्यात सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर आणि अन्य कर्मचाऱ्यांसह २०० अधिकाऱ्यांची टीम जेव्हा अन्य ठिकाणी आणखी काही रोकड असल्याच्या १० कपाटे मिळाली तेव्हा सहभागी झाले आहेत.
४० मशिन्सद्वारे ही रोकड मोजली जात आहे. आजपासून बँकेचे कामकाज सुरू झाल्यावर या मशिन पुन्हा बँकांना पाठवण्यात येतील.नोटा मोजताना अनेक मशिन्स बिघडत आहेत त्यासाठी तांत्रिक कर्मचारीही घटनास्थळी आहेत. बहुतांश नोटा ओडिशातील बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लि.यांच्याशी निगडीत आहेत. आयकर विभागाची टीम कंपनीच्या अधिकारी आणि अन्य लोकांचा जबाब घेत आहेत. काही रोकड साहू यांच्या भागीदारांच्या घरी सापडली. कथितपणे धीरज साहू यांचे कुटुंब एक प्रमुख मद्य उत्पादक आहेत. ते ओडिशातील अनेक कंपन्यांचे मालक आहेत. आयकर विभागाच्या या कारवाईनंतर काँग्रेसच्या धीरज साहू यांनी लांब राहणे पसंत केले आहे. तर धीरज साहू यांच्या व्यवसायाशी काँग्रेसचा काही संबंध नाही असा खुलासा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिला आहे.
राहुल गांधींना उत्तर द्यावे लागेल
या संपूर्ण प्रकरणात भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि झारखंड प्रभारी लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या आरोपापासून लक्ष हटवण्यासाठी I.N.D.I.A आघाडी बनवली. परंतु वसुलीचे त्यांचे स्वप्न भंग झाले. काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे इतकी मोठी रक्कम मिळाली त्यावर राहुल गांधींना उत्तर द्यावे लागेल. हा पैसा कुणाचा आहे आणि त्याचा हेतू काय होता असं त्यांनी विचारले.